Saturday, May 10, 2025

महामुंबईमहाराष्ट्रमहत्वाची बातमी

Scheme For Disabled Persons : लाडकी बहीण-भाऊनंतर दिव्यांगांसाठीही आणली 'ही' खास योजना!

Scheme For Disabled Persons : लाडकी बहीण-भाऊनंतर दिव्यांगांसाठीही आणली 'ही' खास योजना!

दरमहा बँक खात्यात जमा होणार 'इतकी' रक्कम


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण (Ladki Bahin) योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये महिलांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर लाडका भाऊरायासाठीही योजना जारी करण्यात आली. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे. दरम्यान लाडका भाऊ व बहिणीनंतर दिव्यांगांचेही (Disabled Persons) जीवनमान सुधारावे यासाठी खास योजनेची सुरुवात ण्यात येणार आहे. महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी 'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य' योजनेतंर्गत आता दिव्यांगानाही अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.



६० हजार दिव्यांगांना लाभ


बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे ४० ते ८० टक्के दिव्यांग व्यक्तींना यात सहभागी होता येणार आहे. यासाठी दरवर्षी १११.८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून पुढील पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत सुमारे ६० हजार दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका कार्य क्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे.



१ ते ३ हजार रुपयांची मदत


या योजने अंतर्गत वय वर्ष १८ वरील ४० टक्के दिव्यंगत्व आलेल्या व्यक्तींना दरमहा एक हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित सहा हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल. म्हणजेच वार्षिक १२ हजार रुपये मिळतील. त्याचबरोबर ८० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा तीन हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित १८ हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच त्यांना वार्षिक ३६ हजार रुपये मिळतील. या दोन्ही गटातील दिव्यांगांना पुढील पाच वर्षांकरिता हा लाभ मिळणार आहे.



कसा करायचा अर्ज?


या योजनेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवाशी असलेल्या दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर येथे About BMC – Departments - Department Manuals-Assistant Commissioner Planning-Docs- दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना (सन 2024-25 ते सन 2028-29) यावर क्लिक केल्यास अर्जाचा नमुना उपलब्ध होईल.


या योजनेचे अर्ज भरण्यास कोणतीही अंतिम मुदत नसून सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेले अर्ज संबंधित विभाग कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत जमा करावे लागणार आहेत. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र असणे आवश्यक आहे, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment