Thursday, April 24, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीआधी श्रद्धा, मग कृती, नंतर अनुभव

आधी श्रद्धा, मग कृती, नंतर अनुभव

अध्यात्म ब्रह्मचैतन्य – श्री गोंदवलेकर महाराज

गुरुआज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते, तसे गुरूचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणाऱ्याला कसली नड असणार? लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते; परिसापाशी सोने व्हायला रुप्याचे लोखंड व्हावे लागते; तसे, गुरूचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते, ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच होय. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवीत असताना मधूनमधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की, हा आपल्याला बुडू देणार नाही; तसा आपल्याला सद्‌गुरूंचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी.

आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास, श्रद्धा ठेवतो; औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो. व्यवहारात जर असे आहे, तर मग ‘श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही’ असे म्हणणे बरोबर नाही. डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचे कारण असे की, आपल्याला जगायची इच्छा आहे; तसे, भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव, असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे. व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत, तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल. आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो, त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ राहावे. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचे नाही. सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल, तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल. संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली, तो लवकर सुखी झाला. आज आपल्यापाशी ती नाही, तर निदान आपण स्वत:शी प्रामाणिक बनू या. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे, पण एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे. आपण परमात्म्याजवळ मागावे की, “ तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमूक एक तुजजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. ”

तात्पर्य- श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधता येत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -