नागरिकांना पर्यटनस्थळांना भेटी न देण्याच्या सूचना
पुणे : पुण्यात गेल्या २४ तासांपासून पावसाने हाहाकार (Pune rain) माजवला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या, पूरस्थिती निर्माण झाल्याच्या तर भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुण्याच्या मावळ (Maval) आणि मुळशी (Mulshi) भागातील पर्यटनस्थळे (Tourist points) ५ दिवस बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना दोन्ही तालुक्यातील धरण व नदी परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मावळ आणि मुळशी तालुक्यातील सर्व धरणांच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झालेली आहे. ओढे यांचा प्रवाह वाढल्याने धबधब्यातील पाणी प्रचंड वेगाने वाहत आहे. त्यामुळे येथील पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मावळ व मुळशी विभागाचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी हा निर्णय दिला आहे. २९ जुलैला सकाळी ८ वाजेपर्यंत ही पर्यटनस्थळे बंद राहणार आहेत. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून धरणपरिसरासह या सर्व ठिकाणी फिरता बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अतिवृष्टीमुळे मावळ आणि मुळशी दोन्ही तालुक्यातील पर्यटनस्थळे, धरणे आणि सभोवतालचा परिसर, नदीपात्र धोकादायक स्थितीत आले आहे. त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असल्याने सर्व गर्दीच्या पर्यटन ठिकाणामधील धोकादायक ठिकाणी प्रतिबंधित करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले.