
मुंबई : मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, रायगड, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाने हाहाकार उडाला आहे. राज्यभरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू असून पुणे, पिंपरी पिंचवड शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. रत्नागिरीमध्येही जोरदार पाऊस पडत असून जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सर्वत्र पावसाचा जोर वाढत असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पुणे रायगडसह पालघरमधील शाळांनाही आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून सावित्री, कुंडलिका आणि अंबा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पूरस्थिती गंभीर होण्याची भीती आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्वच शाळा, महाविद्यालये आज बंद राहणार आहेत. तसेच पालघरच्या वाडा विक्रमगड भागात आज मुसळधार पावसाची शक्यता असून वाडा आणि विक्रमगड तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
पुणे, पिंपरी, चिंचवडमध्ये शाळा बंद
पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांचे हाल होत आहेत. या दमदार पावसामुळे भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील तसेच पुणे, शहरासह पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
घाटमाथ्यांवरील शाळा बंद!
मागच्या २४ तासांपासून घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरु असून जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देत खेड आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील डोंगरमाथ्यावरील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच उत्तर पुणे जिल्ह्यातील घाटामाथ्यावर पाऊसाची संततधार सुरु असल्याने घाटमाथ्यावरील गावच्या शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
लोणावळ्यातही शाळा बंद!
दरम्यान, लोणावळ्यातही पावसाने तुफान बॅटिंग केली असून उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. आज आणि उद्या लोणावळा नगर परिषद क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस लोणावळ्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.