शाळा महाविद्यालये यांना सुट्टया जाहीर
कर्जत(नरेश कोळंबे)- कर्जत तालुक्यात तसेच लोणावळा खंडाळा घाटात ढगफुटी सदृश पाऊस पडत असून कर्जत खोपोली परिसरात सगळीकडे पाणी भरायला सुरुवात झाली आहे . लोणावळा येथून टाटा धरणातून पातळ गंगा नदीत सुद्धा अविरत विसर्ग होत आहे त्यामुळे सदरील सर्व भागांना धोक्याचा इशारा दिला आहे. याच धर्तीवर कर्जत मध्ये सुद्धा प्रशासन जागृत होत शाळा महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
२४ तारखेपासून कर्जत परिसरात संततधार पाऊस चालू आहे त्यामुळे उल्हास नदी तुडूंब भरून वाहत आहे. वाहणाऱ्या पाण्यामुळे सगळ्या सखल भागात पाणी साठले आहे व त्यामुळे कर्जत मधील अनेक गावांचा रस्ता पाण्याखाली गेल्याने त्या गावांचा संपर्क तुटला आहे. विद्यार्थी वर्गाने ह्या परिस्थितीत वाईट परिस्थिती ला सामोरे जाऊ नये म्हणून प्रशासन जागरूक झाले असून सर्व शाळा व महाविद्यालये यांना सुट्टीचे आदेश पारित केले आहेत.
ज्या ज्या गावांचा संपर्क तुटला त्या गावांमध्ये बीड खांडपे, कोंडीवडे सालपे , नेरळ दहिवली, अंथरट वरेडी , वावे बेंडसे आदि गावांचे रस्ते पाण्याने भरले असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.याच धर्तीवर प्रशासनाने सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.