
एस. टी. कर्मचारी श्रीरंग बरगे यांची मागणी
मुंबई : एसटी महामंडळाने (ST Corporation) ५१५० विजेवरील बस (Electric Bus) कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार एका कंपनीशी केला असून सदर कंपनी दर महिन्याला २१५ बसेस देणार होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते या बसेसचे उद्घाटनही १३ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. परंतु मार्च ते जुलै या पाच महिन्यात एकही बस पुरवठादार कंपनीकडून एसटीला मिळाली नाही. त्यामुळे अशा कराराचा भंग करणाऱ्या कंपनीला मलमपट्टी करण्यापेक्षा तिच्यावर मार्च ते जुलै या कालावधीतील बुडालेले प्रवासी उत्पन्न कंपनीकडून वसूल करण्यात यावे,अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे (Shrirang Barge) यांनी केली.
मोठा गाजावाजा करीत करण्यात आलेल्या उद्घाटनाच्या वेळी ज्या २० बस पुरविण्यात आल्या त्यातील आज पर्यंत एकही बस पुरविण्यात आलेली नाही. ही बेपर्वाई असून कंपनीचा पूर्व इतिहास पाहिल्यास ते या पुढे निश्चित केलेल्या गाड्या निर्धारित वेळेत पुरवू शकत नाहीत, असा आरोप बरगे यांनी केला आहे.
चंदा दो, धंदा लो’ या वसुली योजनेतून सदर पुरवठादार कंपनीची मुख्य कंपनी असलेल्या कंपनीने २०२३ पर्यंत ९६६ कोटी रुपयांचे इलेक्ट्रोरल बॉण्ड खरेदी केले. यातील ५८५ कोटी रुपये सत्तेत असलेल्या एका पक्षाला देणगी म्हणून दिले असल्याने एसटीचे व्यवस्थापन सरकारच्या दबावाखाली कारवाई करण्याची हिम्मत दाखवत नाहीत. त्यामुळे आता सर्व सामान्य नागरिकांकडून होणाऱ्या टिकेमुळे या कंपनीला २ कोटी २० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असून अपयश आल्याने केलेली ही निव्वळ मलमपट्टी असून मार्च २०२४ ते जुलै २०२४ या कालावधीतील बुडालेले प्रती बस सरासरी दिवसाला १६ हजार रुपये प्रवासी उत्पन्न कंपनीकडून वसूल करण्यात आले पाहिजे, असे बरगे यांनी म्हटले आहे.
कंपनीवर सरकार मेहेरबान
त्याचप्रमाणे २० लाख रपये इतकी सबसीडी प्रत्येक बस मागे सरकार देणार असून 190 कोटी चार्जिंग सेंटर साठी खर्च आहेत. एकूण 172 ठिकाणी चार्जिंग स्टेशन बांधण्यात येणार असून त्यापैकी महावितरण कंपनीला १०० कोटी रुपये इतकी अनामत रक्कम भरण्यात आली आहे. तसेच गाड्या वेळेवर न आल्याने सरकारच्या पैशाचा नाहक अपव्यय होत आहे. त्यामुळे जो पर्यंत निश्चित केलेल्या वेळेत गाड्या येत नाहीत तो पर्यंत चार्जिंग स्टेशनसाठी गुंतवलेल्या रक्कमेचे व्याजही कंत्राटदार कंपनीकडून वसूल करण्यात यावे अशी मागणी देखील बरगे यांनी केली.
प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता
एकंदर सर्व परिस्थिती पाहिली तर महामंडळाकडे प्रवाशांसाठी गाड्या कमी पडत असून त्यांची गैरसोय होत आहे. या शिवाय खिडक्या तुटलेल्या व गळक्या गाड्या मार्गावर पाठवल्याने महामंडळाची बदनामी होत आहे.या सर्व प्रकाराला भाडे तत्वावर ई बस पुरवणारी कंपनी असून सदर कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची हिम्मत सरकारने दाखवली पाहिजे व एसटीला स्व मालकीच्या नवीन गाड्या घेण्यासाठी निधी देण्यात आला पाहिजे अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.