परवानगी न दिल्यास शेतकरी उग्र आंदोलन करणार
पेण(देवा पेरवी) – भाताचे कोठार म्हणून पेण आणि अलिबाग हे दोन तालुके संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ओळखले जातात. परंतु आज मितीला पेण आणि अलिबाग तालुक्यातील भात लागवडी क्षेत्रा पैकी 30 ते 40 टक्केच क्षेत्रावर भात शेतीची लागवड केली जाते. उर्वरीत लागवडीच्या क्षेत्रावर खारफुटी (मँग्रोज) अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या वाढलेल्या मँग्रोज मुळे शेतकऱ्याला शेती करणे जीक्रीचे झाले आहे. त्यामुळे शेतातील खारफुटीची झाडे तोडण्यासाठी सरकारने तात्काळ परवानगी द्यावी असे लेखी निवेदन विनोद म्हात्रे यांनी पेण प्रांताधिकारी यांच्याकडे दिले आहे. सदर खारफुटीची झाडे तोडण्यास परवानगी न दिल्यास दोन्ही तालुक्यातील शेतकरी उग्र आंदोलन करतील असाही इशारा दिला आहे.
स्वतःच्या शेतात येणारी खारफुटीची झाडे तोडण्यासाठी शेतक-यांनी हालचाल केल्यास शासकीय अधिकारी उलट शेतक-यांवरच कायदेशीर कारवाई करण्याचा बडगा उचलत असतात. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे जर शेतकऱ्यांनी काही करणास्तव एक ते दोन वर्ष शेती केली नाही तर त्या पिकत्या जमिनी मध्ये खारपूटीची झाडे मोठ्या प्रमाणात वाढतात व पिकती शेती नापीक होते. या झाडांना तोडण्यासाठी शासनाकडून कोणतीही परवानगी मिळत नाही आणि जर शेतकऱ्यांनी झाडे तोडण्याचा तसा प्रयत्न केला तर त्याच्यावर अजमीन पात्र गुन्हा दाखल केला जातो. हे शासनाच धोरण शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पडणार आहे. त्यामुळे शेतातील खारफुटीची झाडे तोडण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी अन्यथा शेतकरी उग्र आंदोलन करणार अशी मागणीचे लेखी निवेदन पेण उपविभागीय अधिकारी यांच्या कडे शेतकऱ्यांचे नेते विनोद म्हात्रे, विवेक जोशी व सी.आर.म्हात्रे या प्रमुखांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर भात शेती असा उल्लेख आहे. अशा जमिनीत जर खारपूटी (मँग्रोज)ची झाडे वाढली असतील तर ती झाडे तोडण्याची परवानगी शेतकऱ्यांना देण्यात यावी, जर तशी परवानगी शेतकऱ्यांना शासनाकडून शेतकऱ्यांना दिली नाही तर भुमिपुत्र शेतकरी म्हणून पेण आणि अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील तरुणांना एकत्र घेऊन शासनाच्या विरोधात उग्र स्वरुपाच आंदोलन करावे लागेल. खारफुटी (मँग्रोज)ची झाडे खारबंदिस्तीच्या खाडीच्या बाजूला असतील तर आम्ही शेतकरी स्वतः त्याचे रक्षण करू पण ही झाडे आमच्या शेतात आली आणि आमची शेती नापिक झाली तर त्यांना मूळासकट उपटल्या शिवाय आम्ही शेतकरी गप्प बसणार नाही. यापुढील एक लढा हा पिकत्या शेती वाचवण्यासाठी असेही विनोद म्हात्रे यांनी सांगितले.