सांगली : काही दिवसांपूर्वी मराठवाड्यासह (Marathwada) साताऱ्यातील कोयना नगर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता सांगली (Sangli News) परिसरही भूकंपाने (Earthquake) हादरला आहे. आज पहाटे सांगली येथील चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच हा भूकंप झाला. काही सेकंद जमीन हादरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास चांदोली धरण परिसरात ३ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. वारणावती परिसरात झालेल्या या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र पहाटेच्या वेळ संपूर्ण परिसरात निरव शांतता असल्यामुळे हा धक्का परिसरात जाणवला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना
दरम्यान, मागील काही दिवसापासून सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने पावसाचा जोर वाढत चालला असून नदी, नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे. यामुळे पुरजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आज झालेला हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असून यामुळे चांदोली धरणाला कोणताही नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.