नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात निधी न मिळाल्याचा आरोप करत विरोधकांनी संसदेसमोर चांगलाच गदारोळ केला. विरोधकांनी आंदोलन करुन सरकारविरोधात चांगलीच घोषणाबाजी केली. मात्र दुसरीकडं संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शून्य प्रहराचं कामकाज सुरू करण्यात आले.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ वर जोरदार टीका केली. यावेळी विरोधकांनी एनडीएची सत्ता नसलेल्या राज्यांना निधी न दिल्याचा आरोप केला. संतप्त झालेल्या विरोधकांनी बुधवारी सकाळी संसदेसमोर निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया ब्लॉक पक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षांचे नेते चर्चा करुन रणनीती ठरण्यासाठी एकत्र आले. विरोधी पक्षनेत्यांच्या मते अर्थसंकल्पात अयोग्य वाटप करण्यात आलं आहे. एनडीएची सत्ता असलेल्या राज्यांना भरघोस निधी देण्यात आला. तर एनडीएची सत्ता नसलेल्या राज्यांना निधी देण्यात आला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.