सोने, चांदीच्या दरात घसरण तर कॅन्सरवरील औषधंही मिळणार स्वस्तात
नवी दिल्ली : एनडीए सरकारच्या (NDA Government) तिसऱ्या कार्यकाळात आज केंद्रीय अर्थसंकल्प (Union budget 2024) सादर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यातच मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक गोष्टींच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कॅन्सरवरील औषधं, सोलार पॅनल, सोने, चांदी, लिथिअम बॅटरी, इलेक्ट्रॉनिक वाहनं, चामड्याच्या वस्तू या सर्व गोष्टी स्वस्तात मिळणार आहेत.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या निर्णयांसह मोबाईल, चार्जर आणि इतर गोष्टींवरील १५ टक्क्यांनी कमी करण्यात आलं आहे. या गोष्टींवर सीमाशुल्क (Custom Duty) खूप जास्त असल्याने या वस्तू खूप महाग होत्या. मात्र, आता मोबाइलवरील पीसीबीए (Printed Circuit Board Assembly) आणि मोबाईल चार्जरवरील बीसीडी (Basic Custom Duty) कस्टम ड्युटी १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे आता ही उत्पादने स्वस्त होणार आहेत. सरकार देशात मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन करण्याला प्राधान्य देणार आहे.
का कमी करण्यात आली कस्टम ड्युटी?
अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत देशांतर्गत मोबाईल फोनच्या उत्पादनात वाढ झाली आहे आणि मोबाईल फोनच्या निर्यातीत १०० पट वाढ झाली आहे. गेल्या सहा वर्षात भारतातील मोबाईल उद्योग खूप विकसित झाला आहे. त्यामुळे मोबाईल आणि चार्जरवरील कस्टम ड्युटी १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोने चांदीच्या दरात घसरण
सोने-चांदी आणि प्लॅटिनमच्या किंमती आता स्वस्त होणार आहेत. सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी ६ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे, तर प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटी ६.५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.