नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प सादर करताना माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा विक्रम मागे टाकत इतिहास रचणार आहेत. दिवंगत माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सलग ६ वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला होता. निर्मला सीताराम या २३ जुलै रोजी त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मनंतर हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने त्याचबरोबर महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका व लोकसभा निवडणुकीत भाजपाचा झालेला दारुण पराभव या अनुषंगाने महाराष्ट्रातील जनतेला खुश करण्यासाठी अधिक निधीची तरतूद विविध योजनांच्या माध्यमातून या अर्थसंकल्पात केली जाऊ शकते.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच संपूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. या तिसऱ्या टर्ममध्ये भाजपाला प्रथमच बहुमतापासून दूर राहावे लागले. त्यातच महाराष्ट्र राज्यासारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होत असल्यामुळे या राज्यासाठी निर्मला सीतारामन यांना विशेष तरतूद करावी लागण्याची शक्यता जास्त आहे.
या अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती पायाभूत सुविधा, महिला कल्याण, गृहिणींना उत्पादन क्षेत्र तसंच ग्रामीण विकास, नवीन प्राप्तिकर प्रणाली, व्यवसायिकांसाठी सुलभ जीएसटी तरतूद, बांधकाम क्षेत्रासाठी विशेष धोरण, कर्ज संरचना, या विषयावरसुद्धा जास्तीत जास्त भर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.