मुंबई : टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत (ICC T-20 World cup) राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने तब्बल १७ वर्षांनंतर विजेतेपद पटकावले. ही मोठी कामगिरी केल्यानंतर राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षक (Head coach) पदातून निवृत्ती घेतली. खरं तर यापूर्वी २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला होता. मात्र रोहित शर्मा आणि जय शहा यांनी त्यांना टी-२० वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत थांबण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत राहुल द्रविड यांनी जबाबदारी स्विकारली आणि भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप जिंकून दिला. यानंतर मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर मिळूनही त्यांनी ती नाकारली. मात्र, आता त्यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून कमबॅक करु शकतात. आयपीएल २०२५ स्पर्धेत ते राजस्थान रॉयल्स संघाला प्रशिक्षण देताना दिसून येऊ शकतात. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने गेल्या हंगामात चांगली कामगिरी केली होती. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा या संघासाठी डायरेक्टर ऑफ क्रिकेटची भूमिका पार पाडतोय. जर राहुल द्रविड यांनी ही जबाबदारी स्वीकारली, तर या संघाची ताकद आणखी वाढेल. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ राहुल द्रविड यांना आपल्या संघात घेण्यासाठी पूर्ण जोर लावू शकतो.
राहुल द्रविड यांना मुख्य प्रशिक्षकपदाचा दांडगा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी राजस्थान रॉयल्स संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये काम केलं आहे. यासह त्यांनी भारताच्या अंडर १९ संघाला देखील प्रशिक्षण दिलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अंडर १९ संघाने वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. यामध्ये आता टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीचीही भर पडली आहे. ही स्पर्धा अतिशय महत्वाची होती. कारण ही मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांची शेवटची स्पर्धा होती. भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली आणि राहुल द्रविड यांना विजयाने निरोप दिला. दरम्यान आता राहुल द्रविड यांना मोठी ऑफर मिळू शकते, असं म्हटलं जात आहे.