वृद्धाश्रम असावा की नसावा यावर अनेक मतमतांतरे मांडली जातात. मूलबाळं नसणं, फक्त मुलीच असणं, मुलं परदेशी राहणं, अविवाहित असणं, शहरात राहण्याच्या जागेचा प्रश्न अशी काही कारणं दिसून येतात. आजकाल आपली समाजरचना झपाट्यानं बदलत आहे. मुलांचं नोकरी-धंद्यासाठी गावातून शहरांकडे तसेच परदेशात जाणं हे घरोघरी दिसून येत आहे. त्याशिवाय अजून एक कारण म्हणजे उपचार पद्धतीमुळे व्यक्तीची वयोमर्यादा ही वाढली आहे. अशा अनेक कारणांमुळे पावलं वृद्धाश्रमाकडे वळतात. हे आपल्याला आजकाल वाढू लागलेल्या वृद्धाश्रमांच्या संख्येवरूनही दिसून येईल.
वाढत्या वयाबरोबर शारीरिक, मानसिक, भावनिक व आर्थिक क्षमतांचा वाढता ऱ्हास होऊन अधिकाधिक परावलंबित्व येणं हा निसर्गक्रम आहे. या काळात दुसऱ्याच्या आधाराची नितांत आवश्यकता भासते. साहजिकपणे हा आधार कुटुंब सदस्याकडून मिळावा ही स्वाभाविक अपेक्षा असते. असाच एक सेवाभावी आश्रम लातूर इथे चालतो. मातोश्री वृद्धाश्रम. लातूरमध्ये ‘विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान’ या रुग्णालयात वृद्धांच्या समस्या पाहून वृद्धाश्रम हा सुद्धा रुग्णसेवेचा एक भाग आहे, अशी धारणा संस्थापक विश्वस्तांची होती. पण आर्थिक असमर्थतेपोटी ती अनेक वर्षं पूर्ण होऊ शकली नव्हती. वृद्धाश्रमाची कल्पना फलद्रूप झाली ती १९९५ साली. तत्कालीन राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात एक शासनाधाराने वृद्धाश्रम स्थापण्याची योजना आली होती आणि त्या योजनेनुसार लातूरमध्ये वृद्धाश्रम सुरू करण्यात आला.
राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांत अशा प्रकारचे मातोश्री वृद्धाश्रम सुरू करण्याचे ठरलं आणि या वृद्धाश्रमांना अनुदान देण्याचंही ठरलं होतं; परंतु शासन बदललं की काही निर्णय किंवा त्याची अंमलबजावणी बदलते त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून लातूरच्या वृद्धाश्रमाला एखाद्या वर्षी तुटपुंज अनुदान मिळतं, तर कधी मिळतच नाही अशी व्यथा संचालकांनी बोलून दाखवली. म्हणजे खरं तर वर्षाला २५ लाख रुपये अनुदान अपेक्षित असतं, ते आतापर्यंत एकूण मिळून फक्त २५ लाख मिळू शकलं आहे. राज्यात इतर ठिकाणी असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमांची सुद्धा थोड्याफार फरकाने हीच अवस्था आहे, असं ते म्हणाले. याबाबत समाज कल्याण विभागाने लक्ष घालावं आणि या योजनेची नीट अंमलबजावणी होईल याकडे लक्ष पुरवावं असं आवाहनही संचालकांनी केलं. आर्थिक पाठबळ न मिळाल्यामुळे त्यातले काही वृद्धाश्रम बंदही पडल्याचं बोललं जातंय याकडे त्यांनी लक्ष वेधलं. केवळ विवेकानंद रुग्णालयाची विश्वासार्हता आणि त्यांच्या आर्थिक पाठबळामुळे लातूर जिल्ह्यात गेली २८ वर्षं मातोश्री वृद्धाश्रम अत्यंत यशस्वीपणे व आदर्शवत कार्यरत आहे. आत्तापर्यंत या वृद्धाश्रमातून पाचशे ते सहाशे वृद्ध राहून गेले आहेत. गरजू वृद्धांना संपूर्णतः विनामूल्य सर्व सोयी इथे उपलब्ध करून देण्यात येतात. स्वतःच्या घरात राहिल्यावर वृद्धांचा जो दिनक्रम असतो तसाच दिनक्रम इथेही राखला जातो. सकाळी उठून संतश्रवण होते. आश्रमात राधाकृष्ण, विठ्ठल रुक्मिणी तसेच हनुमानाचं सुंदर मंदिर उभारलेलं आहे. त्यानंतर नाश्ता, तो झाल्यावर वृत्तपत्र वाचन, दुपारी १२ वाजता भोजन त्यानंतर ४ वाजेपर्यंत विश्रांती. ४ नंतर त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचं नियमितपणे आयोजन केले जातं आणि रात्री ८ वाजता भोजन होतं. भजन, कीर्तन, व्याख्याने हे कार्यक्रम नियमित होतात. दूरदर्शन, वर्तमानपत्रे व मासिके उपलब्ध करून दिली आहेत. एक छोटे ग्रंथालयही आश्रमात उपलब्ध आहे.
अनेक ‘आश्रम-हितेशी’ नागरिक कौटुंबिक आनंदोत्सव व स्मृती कार्यक्रम आजी- आजोबांसोबत साजरे करतात. रोज कमीत कमी एक तरी असा कार्यक्रम होतोच, सर्व सण उत्सव उत्साहात साजरे केले जातात. जिल्ह्यातील दाते तसंच इतर नागरिकांसाठी दिवाळीला दिवाळी मीलन हा खूप छान कार्यक्रम होऊन त्याद्वारे दात्यांच एक गेट-टुगेदर होऊन त्यांच्याप्रति थोडी कृतज्ञता व्यक्त करता येते. लातूर शहरालगत आवी गायरानात शासनाने कराराने दिलेल्या ५ एकर जागेवर हा आश्रम वसला आहे. ३४ खोल्यांचे एक मजली दर्जेदार बांधकाम करण्यात आलं आहे. यातील २६ खोल्यांमध्ये वयस्करांची राहण्याची सोय असून ८ खोल्यांमध्ये वेगवेगळ्या व्यवस्थापकीय रचना आहेत. साधारण १०० लाभार्थीपर्यंत निवासाची सोय आहे. या खोल्यांमध्ये प्रत्येक वृद्धासाठी स्वतंत्र गादी, उशी, पलंग पोस, पांघरुण, ब्लांकेट, कपाट व मच्छरदाणोची व्यवस्था आहे. त्याशिवाय दैनंदिन गरजेच्य वस्तू, नेहमीचे कपडे, पादत्राणे इ. ची सोय केली जाते. वॉकर्स, व्हीलचेअर्स अशा आवश्यक साधनांचीही व्यवस्था आहे. आजी-आजोबांचे वय, विविध आजार यांचा विचार करून आहार शास्त्रानुसार समतोल, रुचकर, ताजा आहार दिला जातो. आश्रम संपूर्णतः विना मोबदला चालवत असल्यामुळे विवेकानंद रुग्णालयाचा मोठा हातभार तर असतोच; परंतु समाजातील दात्यांना सुद्धा विनंती केली जाते. घरातील स्मृतिदिन, वाढदिवस असा रोज कमीत कमी एकतरी असा कार्यक्रम होतोच. स्वतंत्र आरोग्य कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. आठवड्यातून किमान दोनदा बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची तपासणी होते. मोठ्या आजारासाठी व शस्त्रक्रियेसाठी विवेकानंद रुग्णालयाचा आधार तर कायमचा व भक्कम असतोच. शिवाय एम.आय.टी. रुग्णालयाचा आधारही वृद्धाना मिळतो.
प्रारंभीच्या काळात १९९८ ते २००० या दोन वर्षांत शासनाचे काही ना काही आर्थिक सहाय्य आश्रमाला मिळत होते. प्रारंभीच्या सुमारे रु. ६५ लाख खर्चात रुग्णालयाचा वाटा २० टक्के राहिला. १९९८ साली प्रतिष्ठानच्याच व्यवस्थापनात आश्रम सुरू झाला. सुरुवातीपासूनच संघ कार्यकर्त धनाजी तोडकर यांनी प्रकल्पाची जबाबदारी उचलली होती. ती त्यांनी २०१५ पर्यंत अगदी उत्तम रितीने पार पाडली, त्यानंतर तानाजी सावंत व सध्या नृसिंह कासले हे व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत. पहिली दोन वर्षं शासनाच्या धोरणाप्रमाणे निवासीच्या दरडोई मासिक रु. ६०० प्रमाणे अनुदान मिळत होते. २००० साली मात्र शासनात बदल झाल्याबरोबर अनुदान बंद झाले. आश्रम संस्थेकडून काढून घेण्याचाही प्रयत्न काही मंडळींकडून झाला. पण संस्थेने वृद्धांची गरज लक्षात घेऊन न्यायालयीन लढाई करून आश्रम हातून जाऊ दिला नाही. पण अनुदान बंद झाले ते झालेच. आता मातृसंस्था विवेकानंद रुग्णालय व इतर अनेक दानशुरांच्या मदतीने वृद्धाश्रम आजपर्यंत उत्तम रितीने चालू ठेवण्यात यश आले आहे. वृद्धाश्रमात येणाऱ्या वृद्धांच्या कुटुंबाशी पुनर् मिलनासाठी देखील प्रयत्न केले जातात. त्यांची नेमकी समस्या लक्षात घेऊन त्यांच्या मुलांना समजावून सांगणं किंवा वृद्धांच कौन्सिलिंग केलं जातं. काही वेळी या प्रयत्नांना यश येऊन मुलांनी आपल्या आई-वडिलांना परत नेण्याची उदाहरणे आहेत तर कधी कधी मात्र एखाद्या वृद्धाचं वृद्धाश्रमातच निधन होतं आणि मुलं तुम्हीच विधी उरकून घ्या असा निरोप पाठवतात असे अनुभवही येतात. अशा दुर्दैवी वृद्धाचे अंतिम विधी सुद्धा वृद्धाश्रमातर्फे केले जातात. वृद्धश्रमात घरातले वाढदिवस किंवा स्मृतिदिन साजरे करायला येतात. त्यांना नुकतंच २०० माणसं सहज बसतील असं वातानुकूलित श्रीराम सभागृह बांधण्यात आलं आहे. त्याशिवाय जर कोणा सुखवस्तू वृद्धांना स्वतःच्या खोलीत राहायचं असेल तर अशांसाठी शुल्क भरून २ स्वतंत्र एसी रूम सुद्धा नुकत्याच बांधण्यात आल्या आहेत.
वृद्धांना अजून काही सुविधा देण्याचा संस्थेचा मानस आहे. आश्रमातील अंतर्गत रस्ते, वॉकिंग ट्रॅक पक्या बांधणं, भाजीपाला तिथेच सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केला तर बचत होईल त्याशिवाय वृद्धांना सकस आहार देता येईल, त्यासाठी वृद्धाश्रमाकडे खूप मोकळी जागा सुद्धा उपलब्ध आहे, तिथे सेंद्रिय मळा फुलवायची कल्पना आहे. ३२ KW इतक्या क्षमतेची सोलार विद्युत संरचना बसवण्यात आली असून त्यातून दररोज ५० युनिट वीज तयार होते. त्यात सौरऊर्जेचा वापर अजून वाढवून सौर पथदिवे आणि सौर जल विद्युत पंप बसवण्याची योजना आहे. १६ सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याची यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसरासाठी आणखी सी.सी.टी.व्ही. कैमेऱ्यांची संख्या वाढवायाची आहे. सेंद्रिय शेती गांडूळ खताचा छोटासा प्रकल्प सुरू आहे. या सर्व वृद्धांची आपुलकीने सेवा करणे हे खूप मोठं काम आहे, त्यासाठी आश्रमातच पंधरा कर्मचाऱ्यांची निवासी व्यवस्था करण्यात आली आहे. लातूर हा तसा पाण्याची कमतरता असलेला जिल्हा; परंतु वृद्धांची वर्षभर पाण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून १५००० लि. क्षमतेचा एक मोठा जलकुंभ आणि ३०००० लि. क्षमतेच्या हौदाची नव्याने बांधणी करण्यात आली आहे. सध्या आश्रमामध्ये ६३ वृद्ध अतिशय शांत आणि निरामय आयुष्य व्यतीत करत आहेत. वृद्धाश्रम विस्तीर्ण अशा पाच एकर जागेमध्ये वृक्षांच्या सान्निध्यामध्ये उभा आहे. वृद्धाश्रम नाही तर वानप्रस्थाश्रम म्हणता येईल इतका निसर्गरम्य, हिरवागार असा हा आश्रम वृद्धांना शांत आणि निसर्ग सान्निध्यात वृद्धत्व व्यतीत करण्यासाठी एक आदर्श वृद्धाश्रम ठरणारा आहे, हे वृद्धाश्रम बघितल्यावर कोणाच्याही लक्षात येईल.
joshishibani@yahoo.com
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…