मुंबई: भारताच्या महिला संघाने नेपाळविरुद्ध ८२ धावांनी बंपर विजय मिळवला आहे. महिला आशिया कप २०२४च्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने आपले तीन सामने जिंकत ग्रुप एमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.
भारताने आधीच आशिया कपच्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. या लढतीत भारताने पहिल्यांदा खेळताना १७८ धावांचा विशाल स्कोर उभा केला होता. प्रत्युत्तरात नेपाळच्या संघाने सातत्याने विकेट गमावल्या आणि २० षटकांत त्यांना केवळ ९६ धावा केल्या. या पराभवासोबतच नेपाळ अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर गेली आहे.
भारताने नेपाळसमोर १७९ धावांचे आव्हान ठेवले होते. आव्हानाचा पाठलाग करताना २१ धावांच्या आत २ विकेट गमावले होते. दरम्यान कर्णधार इंदु बर्मा आणि सीता मगर यांनी मिळून २२ धावा केल्या. मात्र केवळ ६ बॉलच्या अंतराने दोन्ही फलंदाज बाद झाले. कर्णधार इंदुने १४ धावा आणि सीताने १८ धावा केल्या. या दोघी बाद झाल्यानंतर नेपाळच्या संघाने ५२ धावांवर ४ विकेट गमावल्या. येथूनच त्यांच्या विकेट पडत गेल्या आणि नेपाळने पुढील ४० धावांच्या आत ४ विकेट गमावल्या.
भारताची सेमीफायनलमध्ये धडक
भारताला महिला आशिया ग्रुपच्या एमध्ये स्थान देण्यात आले होते. टीम इंडियाने आपले तीन सामने मोठ्या अंतराने जिंकले आणि आशिया कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. ग्रुप एमधून भारताशिवाय पाकिस्ताननेही टॉप ४मध्ये स्थान मिळवले आहे. आता सेमीफायनलचे सामने ठरलेले नाहीत कारण ग्रुप बीचे २ सामने अद्याप बाकी आहेत.