अनेक मार्ग बंद; नागरिकांचे जनजीवन विस्कळीत
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रात (Maharashtra Rain) जोरदार हजेरी लावली आहे. यातच हवामान विभागाने (IMD) मागील तीन दिवस दिलेला अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा देखील खरा ठरला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक रस्त्यांना नदीचे स्वरुप आले असून नागरिकांचे जनजीवन देखील विस्कळीत झाले. यातच गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. अजूनही ती कायम तशीच राहिली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून गडचिरोली विभागात पावसाची संततधार सुरु असल्याने अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. तसेच शेतांमध्येही पाणी साचल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासोबत जिल्ह्यातून गेलेल्या तीन राष्ट्रीय महामार्गांसह २३ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी अजूनही बंदच ठेवल्याचे दिसून येत आहे. पाऊस सतत चालू असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत नाही, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
दरम्यान, वाहतूक बंद असणाऱ्या रस्त्यांवर पोलीस प्रशासनांकडून बॅरिकेट्स देखील लावण्यात आले आहेत. तसेच सलग दुसऱ्या दिवशीही शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. त्यासोबत गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे वैनगंगा नदीला पूर आल्याने वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.