नवी दिल्ली : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी नवा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये पंतप्रधान मुद्रा योजनेसह, प्रधानमंत्री आवास योजना, MSME क्षेत्र यांबाबत काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच हा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यावर केंद्रीत केला असून यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाबाबत निर्णय घेतला. त्यासोबत महिला व बालकल्याणासाठीही ३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याबाबत सांगितले. यासोबत बळीराजालाही केंद्र सरकारकडून मोठी भेट देण्यात आली आहे. (Budget For Farmers And Agriculture Sector)
मिळालेल्या माहितीनुसार, नैसर्गिक शेती वाढवण्यावर भर देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा केली. त्यामुळे या निधीतून कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी इतर योजना तयार करण्यात येणार आहेत असे त्यांनी म्हटले.
कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रथम प्राधान्य
कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रथम प्राधान्य देणार असल्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (Budget) कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता वाढविण्यासाठी योजनेची घोषणा केली. यामध्ये १.५२ लाख कोटींची तरतूद केली असून सरकार देशात राष्ट्रीय सहकार धोरण आणणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले. त्यासोबतच भाज्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी क्लस्टर योजना देखील आणणार असून ३२ पिकांसाठी १०९ जाती लाँच करणार असल्याचे त्यांनी म्हटले.