Friday, March 21, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra rain updates : मुसळधार पावसामुळे रायगड आणि पूर्व विदर्भातील शाळांना सुट्टी!

Maharashtra rain updates : मुसळधार पावसामुळे रायगड आणि पूर्व विदर्भातील शाळांना सुट्टी!

पवई तलावातून बाहेर आल्या मगरी; राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी सांगली, कोल्हापुरात मुसळधार; वारणा नदीच्या पातळीत वाढ

मुंबई : काल रात्रीच्या सुमारास काहीशी विश्रांती घेतल्यानंतर पावसाने आज पहाटेपासून मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा जोरदार हजेरी (Heavy rainfall) लावली आहे. पूर्व विदर्भात (Vidarbha) तर गेले काही दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे. सततच्या कोसळधारेमुळे चंद्रपुरातील (Chandrapur) शेकडो घरं पाण्याखाली गेली, तर अनेक जनावरेही दगावली. तर नागपूर, गडचिरोलीमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधारेमुळे झालेली परिस्थिती लक्षात घेता आज गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि भंडाऱ्यातील तसेच रायगडमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, नवी मुंबईच्या पवईतील तलाव भरले असून त्यातून मगरी बाहेर आल्या आहेत. त्यामुळे पवई तलाव परिसरात जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मागील ३ दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाली आहे. अनेक मार्ग बंद झाले आहेत तर काही गावांना पुराचा फटका बसला आहे. सोबतच गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. पवनी तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. त्यामुळे आसगावातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. गावाला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं आहे. तर घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याकरिता जिल्हा शोध आणि बचाव पथक आसगाव येथे पोहोचलं आहे. लाखांदूर तालुक्यातील ओपरा या गावातही घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसंच या भागात शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आज भंडारा जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

रायगड, रत्नागिरी, राजापुरात मुसळधार पाऊस

रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी जवळच्या हातीस गावात काजळी नदीचं पाणी शिरल्याने पीर बाबर शेख हे मंदिर पाण्याखाली गेलं आहे. मंदिरात जवळपास पाच फूट पाणी साचलं आहे. राजापूर शहर बाजारपेठ पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहे. मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूल पाण्याखाली गेला आहे. अर्जुना तसेच गोदवली नदीचा राजापूरच्या बाजारपेठेला वेढा बसलाय. शिवाय कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा गगनबावडा कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. असळज ते साळवण दरम्यान खोकुर्ले येथे पाणी आल्याने तसेच गगनबावडा ते कोल्हापूर रस्ता पाणी आल्याने बंद झाला आहे.

पालघरात मुसळधार पावसामुळे एक महिला वाहून गेली…

पालघर जिल्ह्यात पावसाने सलग चार दिवस दमदार हजेरी लावली. आज पाचव्या दिवशीही पावसाची रिमझिम सुरूच असून रविवारी, डहाणू शहरामध्ये सर्वाधिक ३१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर तलासरी तालुक्यालाही पावसाने झोडपून काढलं. तलासरी तालुक्यातील कोमगाव येथून वाहणाऱ्या गावघात नदीला पूर आल्यामुळे या पुरात एक महिला वाहून गेल्याची घटना घडली आहे. सूर्या आणि वैतरणा नद्यांनाही मोठा पूर आला आहे. तर दुसरीकडे सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण ५८ टक्के भरलं असून जिल्ह्यातील इतर लहान धरण ही १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत.

सांगली, कोल्हापुरात मुसळधार; वारणा नदीच्या पातळीत वाढ

सांगलीतही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सांगली कोल्हापूरला जोडणारा वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर कार्वे, ढगेवाडी जक्राईवाडी आणि डोंगरवाडी येथील तलावाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. शिराळा परिसरात आणि चांदोली पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे नदीला पूर आला आहे. वारणा नदीवरील जुना चिकुर्डे ते वारणा नगर पूल तीन दिवस पाण्याखाली गेला असून सध्या या पुलावरून चार ते पाच फूट पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने इशारा पातळीकडे आपली वाटचाल केली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही ३८ फूट १० इंच इतकी पोहोचली आहे. जिल्ह्यातील ८४ बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -