एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
सिंधुदुर्ग : पावसाळी पर्यटनासाठी (Monsoon tourism) गेलेल्या पर्यटकांसोबत घडणाऱ्या दुर्दैवी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे कळूनही तरुणांची हुल्लडबाजी सुरुच आहे. धबधबे तसेच वाहत्या पाण्याच्या टोकावर, दरीच्या कड्यावर उभे राहून तरुण सेल्फी घेताना, फोटोसेशन करताना दिसतात. अशातच आता आज आणखी एक धक्कदायक घटना सिंधुदुर्गातून समोर आली आहे. आंबोलीत (Amboli) वर्षा पर्यटनासाठी (Monsoon Tourism) गेलेल्या युवकाचा दुचाकी घसरल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी गेलेले दोन मित्र कावळेसाद पर्यटन स्थळावरून येत असताना दुचाकी घसरून दुसऱ्या चार चाकी गाडीला धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातात कुडाळच्या सिद्धेश गोसावी याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा सहकारी अक्षय म्हाडगूत हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला तातडीने उपचारासाठी उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.