Thursday, March 27, 2025
Homeसाप्ताहिककोलाजॲमेझॉनची गूढगाथा!

ॲमेझॉनची गूढगाथा!

निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

तसं पाहिलं तर जगामध्ये खूप मोठी जंगले आहेत; परंतु विश्वातील सर्वात मोठे जंगल म्हणजे ॲमेझॉनचे वर्षावन. ॲमेझॉन वर्षावन हे २,७००,००० मैलपर्यंत असून २,१००,००० मैल क्षेत्र हे वर्षावनाचे आहे. जवळजवळ नऊ राष्ट्र व्यापतील एवढे. या जंगलाचा ६० टक्के भाग ब्राझील, १३ टक्के पेरू, दहा टक्के कोलंबिया, बाकी एक्वाडोर, व्हेनेझुएला, गोआना, बोलिविया, दक्षिण अमेरिका यांचा समावेश होतो. जगातील सर्वात मोठे जंगल भारताच्या दुप्पट असणारे. येथे विविध प्रकारची सजीवसृष्टी आहे. वनस्पती, फळ, पशु-पक्षी, भूछत्र, कीटक, खनिजे, नद्या, मैदाने दलदलीय भाग असे अनगिनत की, ज्याची माहिती अजून जगात नाही. अज्ञात असे! असं म्हणतात की, ३९० अरबपर्यंत वृक्ष आहेत. हे आपल्याला ज्ञात असलेले. जैविकदृष्ट्या विविध जीवांचा येथे अधिवास आहे. येथील जैविक विज्ञान आपण समजून घेऊया. येथील वनस्पती विज्ञानावर आपण या लेखात पाहूया. येथे असणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती या अवर्णनीय, अद्भुत आहेत म्हणूनच येथील हवामान हे नैसर्गिक जीवनसृष्टीसाठी पूरक असे आहे. ॲमेझॉन जंगलांना या पृथ्वीची फुप्फुसे म्हटले जातात. या पृथ्वीला २०% ऑक्सिजन हे ॲमेझॉन जंगल देत आहेत. ही जंगले दिसायला आकर्षक, सुंदर, गर्द, रहस्यमयी अशी असली, तरीही भयावहसुद्धा आहेत.

जेव्हा हे विश्व निर्मित झाले, तेव्हा ही पृथ्वी नैसर्गिक सौंदर्य आणि परिपूर्ण जंगलमयच होती. त्या जंगलांवर हळूहळू मानवाने कब्जा केला आणि ही जंगलं नामशेष केलीत; परंतु ॲमेझॉनचे जंगल हे एवढे मोठे आहे की, तिथे पाहिजे तेवढा मानव अजूनपर्यंत पोहोचू शकलेला नाही. ॲमेझॉनच्या गर्द जंगलामध्ये अजून ७५ टक्के भाग अज्ञात आहे. तसं तर इथे अनेक नद्या, उपनद्या आहेत; पण येथील मुख्य ॲमेझॉन नदी ही सहा हजार चारशे किलोमीटरपर्यंत आहे.

असं म्हणतात की, ६६ मिलियन वर्षांपूर्वी या पृथ्वीवर उल्कापिंड जेव्हा पडला, तेव्हा खूप मोठा अग्नी विस्फोट झाला आणि त्यात अनेक डायनासोरसारखे जीव नामशेष झालेत, तर काही वैज्ञानिकांच्या मते ज्वालामुखीचा विस्फोट झाला आणि या पृथ्वीवरील अनेक जीव नामशेष झालेत. कालांतराने अनेक नैसर्गिक घडामोडी होऊन, परत जीवसृष्टी निर्मिती झाली. या उल्कापिंडांमुळेच नंतर परत जीवसृष्टी अॅमेझॉनमध्ये निर्मित झाली. या उल्कापिंडामुळेच डायनासोरसारखे जीव नामशेष झालेत; परंतु परत तिथे हरितक्रांती झाली, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या उल्कापिंडामुळे तेथील वातावरणनिर्मिती अतिशय वेगळी झालेली आहे. निसर्ग नियमानुसार पुनरावृत्ती हा निसर्गाचा नियमच आहे.

अॅमेझॉनच्या जंगलामध्ये अनेक आदिवासी सुद्धा राहतात. काही ज्ञात, तर काही अज्ञात ज्यांचा या जगाशी सुद्धा संबंध येत नाही. या जंगलांमधील रस्त्यांबद्दल आपण अनभिज्ञ असल्यामुळे, या जंगलात एकटे जाणे म्हणजे मृत्यूला कवटाळणे असेच आहे. कोणत्या बाजूने कोणता कीटक येईल किंवा कुठला, कुठली वनस्पती आपला काय घात करतील, हे काही सांगू शकत नाही. दिसायला सुंदर असणारी फुलं, फळं, कीटकसुद्धा अतिशय विषारी असू शकतात. खरं तर ही जंगले इतकी गर्द आहेत की, जमिनीपर्यंत प्रकाश हा पोहोचतच नाही. गंमत म्हणजे येथील जमिनीवर उगवणारी प्रत्येक पालवी ही प्रकाशासाठी धडपडत असते, जी जिंकते तिचीच वाढ होते.

बाकीच्यांना तिथे त्यांचा प्राण त्याग करावा लागतो. ॲमेझॉन जंगलातील वनस्पती ही खरोखरंच खूप दुर्मीळ आणि खास आहे. जी जगभरात कुठेही दिसत नाही. सुगंधित वनस्पती, विषारी वनस्पती, औषधी, दुर्मीळ वनस्पती अगदी विक्सच्या सुवासाच्या वनस्पती, चवदार, बेचव फळ, सुगंधित, विषारी फुलं, स्थिर वृक्ष, तर काही अस्थिर वृक्ष (चालणारे वृक्ष), मांसाहारी तर काही जीवनदायी अशा गुणांनी युक्त असणाऱ्या वनस्पती, शेवाळ, बुरशा, वृक्ष, फळं, फुलं अगदी बियासुद्धा या जंगलात आढळतात.

येथील वनस्पतींमध्ये माहीत असणाऱ्या वनस्पती म्हणजे ताड, बाभूळ, शिशम, ब्राझील नट, रबर, देवदार, हेलिकोनीया फुलं, ऑर्किड परिवारातील सर्वात मोठी फुलं, कोकोआ म्हणजे चॉकलेट, कृष्ण कमळासारखे जांभळ्या फुलांच्या वेली, विशालकाय कमळ या कमळांच्या पानांचा व्यास ४६ सेंटिमीटरपर्यंत असू शकतो. ब्रोमेलीयार्ड हे उष्णकटिबंधीय फूल आहे. याला केशरी, निळी, जांभळी, पिवळी अशी फुलं येतात. बऱ्याचदा झाडांच्या खोडांवर सुद्धा उगवतात. याची पानं गोलाकार असतात. ज्यात पाण्याचा साठा हे करून ठेवतात. कॉफीचे वृक्ष येथे भरपूर प्रमाणात उगवतात; कारण त्यांना हे वातावरण पूरक आहे.

एंजेलिन वर्मेलो या प्रजातीचा वृक्ष २९० फूट उंच आणि ३२ फूट व्यासाचा वृक्ष या जंगलात मिळाला आहे. ४०० ते ६०० वर्षं इतका जुना वृक्ष २०१९ मध्ये सॅटेलाइट फोटोमध्ये हा वृक्ष पाहायला मिळाला होता. येथे जास्तीत जास्त पाम वृक्ष, ब्राझील बांबू, पॅशन फ्रुट ब्लॉसम, मंकी ब्रशवेल, काजू, अद्भुत बेरी अशी प्रसिद्ध झाडे आहेत. ब्राझीलमधील ॲमेझॉन खोऱ्यात ई-पे लाकूड हे अतिशय दुर्मीळ, नाजूक, लवचिक आणि प्रसिद्ध आहे.

या वृक्षांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यामुळे, ही झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कॅरीनिया मिक्रांथा ही सर्वात जुनी प्रजाती. सुमाउमेरा २०० फूट उंचीचा दहा फुटांपेक्षा जास्त व्यासाचा वृक्ष.

शेवाळयुक्त ऑर्किडची झाडे येथे बरीच दिसतात. मेथूसलेह नावाचे झाड ९७० वर्षांचे असावे, असा अंदाज आहे. हॉट लिप्स अगदी आपल्या लाल चुटुक ओठांसारखे, स्पायडर लिली लालसर लांबट पाकळ्यांची कोळ्यांच्या पायांसारखे. हेलिकोनिया, इरोन वूड, अकाई, रेड जिंजर, पाममाऊंटन, सोरसोप छोट्या फणसासारखी फळ असलेले, रेनबो युकेलिप्टस अडीचशे फूट जवळजवळ इंद्रधनुष्य रंगीबेरंगी खोडाचेच हे झाडसुद्धा आढळते.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -