
शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या आमदारांचा लागणार सुप्रीम निकाल
नवी दिल्ली : शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या फुटीनंतर कोणाचा पक्ष खरा यासोबतच आमदार अपात्रतेचा मुद्दा निकालात येणं बाकी आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या आमदारांबद्दल ठाकरे गट व शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला होता. नार्वेकरांनी शिवसेना व ठाकरे गट यांपैकी बहुमताच्या जोरावर खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल देत कोणत्याही गटाचे आमदार अपात्र ठरवले नाहीत. राष्ट्रवादीच्या बाबतीतही त्यांनी असाच निकाल दिला.
त्यामुळे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नाही म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली. तर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र न केल्याबद्दल शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या दोन्ही याचिकांप्रकरणी आता सुनावणीची तारीख समोर आली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेची देखील याचिका दाखल
सुप्रीम कोर्टात दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रतेप्रकरणी आता २३ जुलै रोजी सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट आमदार अपात्रतेचा निर्णय बदलणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. दरम्यान, मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शिवसेना प्रकरणाची ओरिजनल कागदपत्रे मागितली होती. त्यामुळे राहुल नार्वेकर ही कागदपत्रे सादर करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. आमचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. त्यामुळे त्यांनी शिवसेना ठाकरे गटातील १३ आमदारांना अपात्र करायला हवं होतं, असं शिंदे गटाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. इतकंच नाही तर, या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी व्हावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेबाबतचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आमदार अपात्र प्रकरण आणि दोन्ही पक्ष नेमके कुणाचे? यावर सुप्रीम कोर्ट नेमका काय निर्णय देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.