१८ जुलै रोजी हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘पहिला सुपरस्टार’ म्हणून गाजलेल्या राजेश खन्नाची १२वी पुण्यतिथी झाली. तो आज आपल्यात असता तर ८२ वर्षांचा असला असता. दिलीपकुमार, धर्मेंद्र यांच्याकडे पाहता हे काही फार वय नव्हते पण एका अर्थाने ती त्याची कर्करोगाच्या प्रदीर्घ आजारातून झालेली सुटकाही होती. शेवटी शेवटी मुंबईतील ‘लीलावती’ इस्पितळात तो अनेकदा दाखल व्हायचा आणि बरे वाटून थोड्या दिवसांनी बाहेर यायचा. अखेरीस १८ जुलै २०१२ ला त्याने हे जग सोडले. मात्र ‘वर’ गेल्यावर कादर खानच्या ‘रोटी’मधील प्रसिद्ध संवादाप्रमाणे त्याने परमेश्वराला “देख, इन्सानको दिल दे, जिस्म दे, दिमाग दे, लेकीन ये कम्बख्त पेट मत देना, और देता हैं तो उसकी दो रोटीयोका इंतजामभी कर. वरना तुझे इन्सानको पैदा करनेका कोई हक नही!” असे खडसावले की नाही ते कळायला मार्ग नाही! पण अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या आणि टोकाच्या गरिबीचे जीवन जगलेल्या कादर खानने मात्र हा संवाद अगदी कळवळून लिहिला होता हे खरे! आणि राजेश खन्नाने तो आपल्या जिवंत अभिनयाने सर्वांच्या मनात उतरवला होता.
कारकिर्दीत तब्बल ५ फिल्मफेयर घेणाऱ्या राजेश खन्नाने १९६६ साली ‘आखरी खत’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तेव्हापासून ‘अवतार’पर्यंत त्याचे अनेक चित्रपट गाजले! त्याची लोकप्रियता शेवटपर्यंत एवढी होती की, १९ जुलै २०१२ ला अंत्यविधीसाठी तब्बल ९ लाख चाहते देश-विदेशातून मुंबईत हजर झाले होते. गर्दी आवरेना म्हणून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.
काकाजीच्या अनेक लोकप्रिय चित्रपटांपैकी ५ चित्रपटांतील त्याच्या भूमिका प्रेक्षक कधीही विसरू शकणार नाहीत. ‘आराधना’(१९६९), ‘आनंद’(१९७१), ‘बावर्ची’, ‘अमरप्रेम’(१९७२) आणि ‘नमकहराम’(१९७३). आनंद आणि बावर्चीमध्ये तर ऋषिकेश मुखर्जी आणि राजेश खन्नाने सगळ्या प्रेक्षागाराला अनेकदा रडवले. अभिरुची संपन्न प्रेक्षक आहेत तोवर हे चित्रपट अजरामरच राहतील. असाच त्याचा ‘सच्चा-झूठा’ आला १९७० साली! मनमोहन देसाईंच्या या सिनेमाने त्याला १९७१ चे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे फिल्मफेयर मिळवून दिले. त्यावर्षी सर्वात जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या सिनेमात त्याचा क्रमांक दुसरा होता. काकाजीने १९६९ पासून १९७१ पर्यंत दिलेल्या १७ हिट चित्रपटात ‘सच्चा झुठाचा’ समावेश होतो. यात राजेशबरोबर इन्स्पेक्टर लीनाच्या भूमिकेत मुमताज, इन्स्पेक्टर प्रधानच्या भूमिकेत विनोद खन्ना आणि विनोद खन्नाच्या आईच्या भूमिकेत दिना पाठक होत्या.
खेड्यातील एक बँडवादक असलेला भोला(राजेश) बहिणीच्या लग्नासाठी पैसे मिळवण्याकरिता मुंबईत येतो. हुबेहूब भोलासारखा दिसणारा एक बदमाश रणजीतकुमार (राजेशचा डबल रोल) त्याच्या भोळेपणाचा फायदा घेत त्याला आपल्या गुन्हेगारीत गुंतवतो. एका मोठ्या दरोड्यात दोघांनाही अटक होते. दरम्यान भोलाची बहीण त्याला शोधत मुंबईत आलेली असते. तिचा गावाकडील कुत्रा ‘मोती’ भोलाला ओळखतो आणि पोलीस त्याला सोडतात व रणजीतला अटक करतात. दरम्यान भोला आणि लीनामध्ये प्रेम निर्माण झालेले असते. त्या दोघांचे लग्न होते आणि भोलाची बहीण (कुमारी नाझ)चे लग्न इन्स्पेक्टर प्रधान यांच्याबरोबर होते अशी ही सुखांतिका!
गाणी इंदीवर यांची होती आणि ठेकेबाज संगीत कल्याणजी आनंदजी यांचे! त्यांचे ‘युंही तुम मुझसे बात करती हो’ हे लतादीदी आणि रफीसाहेबांनी गायलेले रोमँटिक गाणे युवकात खूप लोकप्रिय झाले. किशोरदांनी गायलेले ‘मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनियां…’ हे तर बिनाकाला दुसऱ्या क्रमांकावर वाजले. आजही ते जवळजवळ प्रत्येक लग्नात वाजतेच. किशोरदांनीच गायलेले आणखी एक गाणेही लोकप्रिय होते. मनमोहन देसाई यांनी भोलाच्या तोंडी दिलेल्या त्या गाण्याचे शब्द होते –
“दिलको देखो चेहरा ना देखो,
चेहरोंने लाखों को लूटा.
दिल सच्चा और चेहरा झूठा.”
एक सार्वकालिक सत्य. खेड्यातून आलेला साधाभोळा ‘भोला’ जसजसा शहरातील गुन्हेगारीत लिप्त ढोंगी समाजाचे रूप ओळखू लागतो तसतसे त्याला धक्के बसत जातात. म्हटले तर या ओळी त्याच्या या अनुभवांचे बोल होते आणि म्हटले तर गीतकाराने सर्वांनाच दिलेला इशारा होता.
शहरी दिखाऊ समाज कसा वागतो, कसा “आत एक बाहेर एक” करतो याकडे लक्ष वेधून भोला म्हणतो, ‘इथे प्रत्येकाने आपल्या मूळ रूपापेक्षा वेगळेच रूप धारण केले आहे. मनात सगळा कचरा भरला आहे पण भाषा अत्यंत गोड वापरली जाते.’ त्यामुळे केवळ शब्दांवर विश्वास ठेवणे अतिशय धोक्याचे आहे. हल्ली मनाचा ओठांशी काही संबंधच राहिलेला नाही. मनात एक आहे तर ओठावर दुसरेच!
जो अपनी सच्ची सूरत दिखा दे,
ऐसे नहीं दुनियावाले,
सबनेही अपने चेहरोके आगे,
झुटके परदे हैं डाले.
मीठी होंठोपे बात,
दिलमें रहती है खात,
दिलका होंठोसे नाताही टुटा.
दिल सच्चा और चेहरा झूटा…
हे गाणे एका पार्टीत राजेश गातो. दिग्दर्शकांनी एकेका ओळीनुसार दृश्ये रचली होती. इंग्रजी पोषाख केलेली व्यक्ती भोलासमोर येते तेव्हा त्याचे शब्द येतात –
तनसे तो आजाद हम हो गए हैं,
मनसे गयी ना गुलामी,
परदेसी भाषा और वेशकोही,
देते हैं अब्बतक सलामी.
भूलकर अपना रंग, सीखे औरों का ढंग,
अपनेपनका चलन हमसे छूटा…
दिल सच्चा और…
हे कडवे ऐकताना आपण अगदी ३०/४० वर्षांपूर्वीचे दिवस जरी आठवले तरी पटते – आपले एकेक संस्कार, वैशिष्ट्य सुटता-सुटता जवळच्या नात्यातला आपलेपणाही हल्ली संपुष्टात आला आहे. देशभर पसरलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे कितीतरी पिढ्या भारतीय भाषांपासून, संस्कृतीपासून, अगदी आई-वडिलांपासूनही दूर गेल्या आहेत. आता चांगले मॅनर्स महत्त्वाचे! मनात काय वाटते ते नाही. मनातले मनातच ठेवून वरून खोटे खोटे चांगले बोलायचे, वागायचे, दिसायचे, हे तर आपणही शिकलोच की! इंदीवरसारखे गीतकार त्या त्या प्रसंगानुरूप गाणे लिहितानाही समाजाला एखादा सुंदर संदेश सहजच देऊन टाकत तो असा!
मर्जी तुम्हारी, तुम कुछ भी समझो.
जो हम हैं वो हमही जाने.
रंगरूप देखे तो देखे जमाना,
हम प्यारके हैं दीवाने.
पूजे धनको संसार, हमें मनसे है प्यार.
धन किसी बातपर हमसे रूठा.
दिल सच्चा और चेहरा झूटा.
गावाकडे गरिबीमुळे बहिणीचे लग्न करू न शकणारा भोला मुंबईत इमानदारीने चार पैसे कमवायला आला आहे. त्याला दोन समाजातली टोकाची परस्परभिन्नता खुपते आहे. आपले दारिद्र्य भेडसावते आहे. म्हणून तो म्हणतो, मी मनाने कितीही सच्चा वागलो तरी लक्ष्मी माझ्यावर रुसलेलीच दिसते. ही खंत प्रत्येकच प्रामाणिक माणसाला सतावत नसते का?
‘सच्चा-झूठा’चे हे गाणे इंदीवर यांनी १९७० मध्ये म्हणजे चक्क अर्ध्या शतकापेक्षाही जास्त आधी लिहिले आहे. पण इतकेच सांगा, यातला एक तरी शब्द आज खोटा ठरू शकेल का? असे कालातीत लिखाण हेच तर या कवींचे चित्रपटसृष्टीला, समाजाला दिलेले अतुल्य योगदान, त्यांचे वेगळेपण!
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…