Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजकुंकवाचा तेजपुंज आविष्कार...

कुंकवाचा तेजपुंज आविष्कार…

हलकं-फुलकं – राजश्री वटे

पहाटेची पक्ष्यांची किलबिल, सूर्यकिरणांचा केशरी शेला पांघरायला धरणी उत्सुक…
पानांवर दवबिंदूची सावरून बसण्याची लगबग… रात्रीचा रातराणीचा सुगंध आसमंतात दरवळलेला… पारिजात, गुलाब, मोगरा यांचाही सुवास त्यात समरसून जातो… मंद मंद सुगंधी वातावरण मन उल्हासित करतं!

पूर्वीच्या काळी… अशा प्रसन्न पहाटे… घरची गृहिणी स्नान वगैरे आटोपून, तोंडाने श्लोक पुटपुटत स्वतःची तयारी आटोपत असे. एक छोटासा आरसा भिंतीला टेकवून, नीट चेहरा दिसेल असा ठेवून, वेणीफणी करायला बसत असे. केसांचा चापूनचोपून सुंदर खोपा घालून चेहऱ्यावरून हात फिरवते नीटसा… तिला लागणाऱ्या शृंगाराचे साधनं पितळेच्या डब्यात ठेवलेले असतात… हे तिचं स्वतःचं असतं… हक्काचं!!

त्यात एक मेणाची डबी, एक गोल नाणं ज्याचा मधला गोल भाग पोकळ असतो… आरपार… हे सगळं तिनं जपलेलं… त्या डब्यासह! आरशात न्याहाळत ते नाणं एका हातानं कपाळावर मध्यभागी धरून दुसऱ्या हाताच्या तर्जनीनं नाण्याच्या मोकळ्या भागात मेण लावते, बोट गोल फिरवून नंतर चिमटीत कोरडं कुंकू घेऊन, पिंजर ही म्हणतात या कुंकवाला, मान जराशी पुढे झुकवून मेणावर लावते अन् हळूच नाणं बाजूला करते… सुंदर! जणू पौर्णिमेचा लालसर चंद्र तिच्या भाळी दिमाखात अवतरला… हा जुन्या काळी कुंकू लावण्याचा साग्रसंगीत सोहळा!!

देवपूजेत पहिलं मानाचं स्थान कुंकवाचं, त्या पाठोपाठ हळद, गुलाल, शेंदूर, अबीर, बुक्का, भंडारा!!
देव-देवकांमध्येही कुंकू लावण्याचे अनोखेपण दिसते… जसे, रेणुका देवीच्या कपाळापासून नाकापर्यंत ओल्या हळदीचा लेप चढवला जातो व कपाळाच्या मध्यभागी कुंकवाने ॐ कोरलेला आहे, तिच्या देवळात जोगवा मागणाऱ्या स्त्रीचं कपाळ मळवटाने भरून जागर केला जातो, भक्तिमय वातावरण जागृत झालेलं दिसून येतं… विठ्ठलाच्या कपाळावर चंदनाने गोल काढून नाकापर्यंत एक रेषा खाली आणली आहे व कपाळाच्या मध्यभागी बुक्क्याचा गोल काळा टिळा उठून दिसतो, वारकरी तर विनाचंदन टिक्याचा सापडणं दुर्मीळच! शंकराच्या भाळावर भस्माच्या तिनं आडव्या रेषा म्हणजे अद्भुततेचा दृष्टांत!!

गणपतीच्या मस्तकी कुंकवाचे त्रिशूळ दिसेल, तसेच सोंडेवर ॐ दृष्टीस पडतो.
दत्तगुरूंच्या कपाळावरची चंद्रकोर शांततेच प्रतीकच जणू, मागे उभ्या असलेल्या गाईच्या कपाळावर सुद्धा लाल कुंकवाचा उभा टिळा… सुखावतात नेत्र इथे!!

रघुवंशी राजघराण्यातील दशरथ पुत्र श्रीरामाच्या भाळी कुंकवाने सूर्य कोरलेला! तसेच सूर्यपुत्र कर्णाच्या मस्तकी सूर्यच आहे, त्याच्या सामर्थ्याचं द्योतकच. निळ्या कृष्णाच्या भाळी लाल चंद्रकोर दिसते, नागदेवतेच्या कपाळी कुंकू रूपात नागाचेच दर्शन व्हावे, यमाच्या कपाळीसुद्धा मोठा उभा काळा टिळा भीती घालतो…

देव-देवकांनंतर… अनेक घराणेशाही… अनेक पिढ्यांमध्ये स्त्री तथा पुरुष यांच्यात कुंकवाचे विविध प्रकार बघण्यात येतात!

जसे… शिवाजी महाराजांच्या काळात… पुरुषामध्ये… राजापासून मावळ्यापर्यंत भाळी चंद्रकोर असणारच व स्त्रियामध्ये रुपया एवढ्या नाण्याच्या आकाराचे ठसठशीत कुंकू…
त्याचप्रमाणे पेशवे घराणेशाहीमध्ये कुंकू म्हणजे चंद्रकोरला महत्त्व… स्त्री-पुरुष… दोघांमध्येही!

होळकर घराण्यातील स्त्रिया कपाळावर कुंकवाची चिरी लावत म्हणजे कुंकवाने आडवी रेषा काढत, सावित्रीबाई फुले यांच्या कपाळावर असायची तशी कुंकवाची चिरी! टिळकांपासून अनेक मान्यवर सत्याग्रही पुढऱ्यांच्या कपाळावर चंदनाने U आकाराचे गंध असायचे. कृष्णाच्या इस्कॉन मंदिरातील भक्तांचे चंदनाने रेखाटलेली कुंकवाकृती तुळशीचे पान खाली! कपाळाच्या वरच्या टोकापासून नाकाच्या मध्यापर्यंत… अतिशय रेखीव दिसते! देवाच्या उत्सवामध्ये मिरवणुकीत हत्तीच्या गंडस्थळावर गंधाने त्रिशूळ काढतात… त्याच्या सामर्थ्यांच प्रतीक दर्शवतं!

रथयात्रेतील घोड्याच्या कपाळावरील तिलक राजेशाही थाट निर्मितो… शेतामध्ये मेहनत करणारे बैल… पोळ्याच्या दिवशी मस्तकावर लाल टिळा लावताच दैवी भासतो… जो खरोखर शेतकऱ्यांचा देव असतो… अन्नदाता असतो!
मराठमोळ्या हिंदू संस्कृतीमध्ये बालपणापासून कुंकवाचं विशेष स्थान आहे… लहान बाळाला दृष्ट लागू नये म्हणून काळी तीट लावतात… किती लोभसवाणं दिसतं ते बालरूप!!

खणाचं परकर पोलकं नेसलेली धिटुकली कपाळावर छोटीशी टिकली लावून मिरवते, तेव्हा काय गोड दिसते… आजच्या पिढीला कुंकवाचं फारसं महत्व नाही, मात्र तरीही आजकाल पारंपारिक वेशभूषा परिधान करण्याची प्रथा म्हणून जोपासण्याकडे कल वाढतो आहे, तेव्हा हमखास कपाळावर ठसठशीत कुंकू किंवा चंद्रकोर दिमाखात मिरवतात, नथ नऊवारी नेसून!! तसेच… पुरुष मंडळी… त्यात युवापिढी.. कपाळी टिळा व फेटा असा संस्कृती प्रधान पेहराव करण्याची आवड निर्माण झाली आहे.

अशी आपली संस्कृती लालचूटूक कुंकवाने, पिवळ्या हळदीने, चंदन, अबीर, गुलाल यांच्या वेगवेगळ्या रंगानी सुशोभित झाली आहे…
म्हणतात ना….
दुसऱ्याच्या कपाळी चंदनाचं
गंध लावताना…
लावणाऱ्यांचे बोटं सुगंधी होतात!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -