सावंतवाडी येथील न्यू सबनिसवाडा इ. स. १८८४ मध्ये श्री एकमुखी दत्तमंदिर स्थापन झाले. इ. स. १८८४ मध्ये एकमुखी दत्तमूर्तीची विधिवत चलस्थापना करण्यात आली. औदुंबर वृक्षाच्या बुंध्यामध्ये माणगाव येथे असलेल्या स्वामींच्या ध्यानधारणेच्या गुहेचा आकार आला असून, खोडावर पादुकादेखील प्रकट झाल्या आहेत.
प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींच्या आशीर्वादाने इ. स. १८८४ मध्ये सावंतवाडी येथील न्यू सबनिसवाडा येथे श्री एकमुखी दत्तमंदिर स्थापन झाले आणि प. प. टेंब्ये स्वामी पादुका मंदिराची स्थापना इ. स. १९१६ मध्ये झाली. नारोपंत उकिडवे, सावंतवाडी यांना असे स्वप्न पडले की, देवालयात दोन ब्राह्मण बसले आहेत आणि नारोपंत उकिडवे देवालयाच्या बाहेरच्या बाजूस उभे आहेत. आतील दोन ब्राह्मणांपैकी एकाने एक कागद नारोपंतांना दाखवत असे सांगितले की, “या ठिकाणी असे घडणार असून याला हा आधार.” त्याचवेळी नारोपंत स्वप्नातून जागे झाले; परंतु त्यांना स्वप्नाचा अर्थ समजला नाही. या सुमारास नारोपंतांना प्रापंचिक स्थितीचा कंटाळा येऊन, मनाचे औदासिन्य वाढत गेले. शेवटी एकांतात बसण्यासाठी म्हणून घराच्या आवारात एखादी छोटीशी वास्तू बांधावी, असे ठरविले. खोदाई पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी देवालय बांधण्याचे मनात नव्हते; परंतु खोदाई करताना मातीच्या राशीत दोन पादुका कोरलेला चौकोनी दगड सापडला. कामाच्या आरंभी पादुका सापडणे हे शुभचिन्ह समजून खोली बांधून झाली. त्या खोलीत मातीची पेढी उभारून त्यावर त्या पादुका, मागे दत्त महाराजांची तसबीर व पुढे गुरुचरित्राची पोथी ठेवली. यावेळी एकदम स्वप्नाचे स्मरण होऊन स्वप्नात हे पाहिले त्याचा हा फोटो असे नारोपंतांना आठवून आनंद झाला.
एक-दोन महिन्यांत एक विलक्षण गोष्ट घडली. इ. स. १८८३ मध्ये माणगाव येथे प. प. टेंब्ये स्वामींनी दत्त मंदिराची स्थापना केल्याने, नारोपंतांचे तेथे जाणे-येणे होतेच. नारोपंतांवर टेंब्ये स्वामींची फार प्रीती होती. एके दिवशी नारोपंतांच्या देवालयाचे दार उघडण्यासाठी, नारोपंतांच्या घरातील माणूस गेला असता, देवालयाच्या उंबरठ्यावर सुरेख संगमरवरी दगडावर कोरलेल्या पादुका आढळून आल्या. नारोपंतांना हाक मारून, त्याने त्या पादुका दाखवल्या. तेवढ्यात त्यांच्या घरात झोपलेला एक पाहुणा जागा होऊन, देवळाकडे येऊन म्हणाला, “आताच मी स्वप्न पाहिले की, माणगावचे बुवा (टेंब्ये स्वामी) इथे येऊन परत जात होते. त्यांना मी विचारले, आज आपण इथे का आला होता? त्यावर ते म्हणाले, “नानांनी देऊळ बांधले आहे, त्यात पादुका ठेवून जातो.” असे स्वप्न पाहून जागा झालो व देवळाकडे काय गडबड चालली आहे, हे पाहून येथे आलो. हे गूढ न समजल्याने, नारोपंत त्या पादुका घेऊन, टेंब्ये स्वामींकडे गेले व घडलेला प्रकार सांगितला. त्यावर स्वामी महाराज म्हणाले, “देवाच्या लीला अगाध आहेत, त्या मनुष्यास कशा समजणार? परमेश्वराने प्रत्यक्षात आणून दिलेल्याची आणखी अर्चा काय करणार? भक्तिपूर्वक पूजा व्हावी हीच अर्चा.”
यानंतर ध्यानाला सुगम साधन होण्यासाठी, दत्तमूर्ती असावी असे वाटून, नारोपंतांनी कुरुंदवाड येथून वीतभर उंचीची पंचधातूंची मूर्ती आणली. ती दाखविण्यासाठी, ते माणगावला स्वामींकडे गेले; परंतु एवढ्यात ही मूर्ती पूजण्याचा अधिकार नाही, आज्ञा होईल तेव्हा मागाहून सांगण्यात येईल, एवढेच म्हणाले. त्यामुळे ती मूर्ती प. प. टेंब्ये स्वामींकडे देऊन, नारोपंत सावंतवाडीला आले. ६ महिने ती मूर्ती प. प. टेंब्ये स्वामींकडे माणगावला होती. त्यानंतर मूर्ती स्थापनेची आज्ञा झाल्यावर इ. स. १८८४ मध्ये एकमुखी दत्तमूर्तीची विधिवत चलस्थापना करण्यात आली.
देवालयाच्या समोर औदुंबर वृक्ष आपोआप रुजला असून, त्याला पार बांधून, मंदिराच्या खोदाईत मिळालेल्या काळ्या दगडाच्या पादुका तिथे ठेवण्यात आल्या असून, नित्यनेमाने त्याची पूजा होते. याच औदुंबर वृक्षाच्या बुंध्यामध्ये माणगाव येथे असलेल्या स्वामींच्या ध्यानधारनेच्या गुहेचा आकार आला असून, खोडावर पादुकादेखील प्रकट झाल्या आहेत. प. प. टेंब्ये स्वामी महाराज एकमुखी मंदिराच्या मागील बाजूच्या खोलीत विश्रांती घेत, मुक्काम करत. ही खोली आजही तशीच असून ती शेणाने सारवली जाते.
प. प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये स्वामी) महाराजांचे महानिर्वाण इ. स. १९१४ मध्ये गरुडेश्वर, गुजरात येथे झाले. त्यामुळे स्वामीभक्त नारोपंतांना स्वामींचा विरह सहन होईना. तेव्हा नारोपंतांना टेंब्ये स्वामी मंदिर बांधण्याची इच्छा झाली. त्यावेळी नारोपंतांना पादुकांचा दृष्टांत होऊन, त्यात स्वामीजी आहेत असे जाणवले. त्याप्रमाणे गरुडेश्वर येथील समाधी मंदिरामध्ये आहेत, तशाच पादुका मुंबई येथून तयार करवून आणून वैशाख शुद्ध द्वादशी, शके १८३८ म्हणजे इ. स. १९१६ रोजी स्थापना झाली. या मंदिराचा शतक महोत्सव इ. स. २०१५ ते २०१६ असा वर्षभर आध्यात्मिक कार्यक्रम व सावंतवाडी शहरात प्रथमच पालखी काढून साजरा करण्यात आला. मंदिरात दररोज सायंकाळी ७.०० वाजता आरती व नामस्मरण होते.
एकमुखी दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो.
भविष्यात मंदिरामध्ये होणारे कार्यक्रम यासाठी सभामंडप, बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तांसाठी भक्तनिवास, प्रसादगृह, आरोग्याच्या दृष्टीने गोरगरिबांसाठी आरोग्य कार्यशाळा, आरोग्यदायी वृक्षांचे संगोपन व संवर्धनासाठी आयुर्वेदिक झाडांचे सुंदर असे उद्यान, ध्यानधारणेसाठी, योग साधनेसाठी हॉल असे संकल्प एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती स्वामी मंदिर यांसकडून केलेले असून त्यासाठी अंदाजे २.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. श्री स्वामींच्या आज्ञेनुसार काम सुरू केलेले असून, भक्तांकडून सदरचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी, आर्थिक तसेच वस्तुरूप मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
शतक पार केलेली ही दोन्ही मंदिरे जीर्ण झाल्याने, पावसाळ्यात पाणी गळती होत होती. भक्तगणांना उभे राहण्यास, कार्यक्रम करण्यास त्यामुळे कष्ट पडत होते. प. प. टेंब्ये स्वामींच्या भक्तांनी एकत्र येत देवस्थान व स्थानिक सल्लागार उपसमिती यांच्या सहकार्याने मंदिराचा सुमारे ३५०० चौ. फुटांचा सभामंडप बांधण्याचा संकल्प केला आहे. सदर सभामंडपाचे बांधकाम १.२५ कोटी व भक्तनिवास, प्रसादगृह, आयुर्वेदिक कार्यशाळा इत्यादींच्या कामासाठी मिळून एकूण २.५० कोटी रुपये खर्च आहे. स्वामींच्या कृपेने श्री एकमुखी दत्त मंदिरच्या सभामंडपाचे भूमिपूजन २६ जानेवारी २०२० रोजी झाले व शीघ्रगतीने बांधकामासही सुरुवात झाली आहे. सभामंडपाच्या कॉलम आणि आर्चचे काम पूर्ण होत आलेले आहे. सभामंडपाच्या कामासोबतच एकमुखी दत्तमंदिर आणि प.प. टेंब्ये स्वामींच्या दर्शनासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तांच्या निवाऱ्यासाठी भक्तनिवास, प्रसादगृह, आयुर्वेद कार्यशाळा व आयुर्वेदिक झाडांचे सुशोभित उद्यान उभारण्याचाही समितीचा संकल्प आहे.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…