शाळा सुरू होऊन दहा-पंधरा मिनिटे झाली होती, तरीही प्रणव शाळेत पोहोचला नव्हता. आज खूपच उशीर झाला होता. तो धावत धावतच वर्गात पोहोचला. टिळक सरांचा भूगोलाचा तास सुरू होता. दरवाजात उभा राहून प्रणव म्हणाला,
“सर येऊ का वर्गात,
आज उशीर झालाय भलताच
भूगोल माझ्या आवडीचा
शब्द देतो वेळ पाळण्याचा!”
टिळक सर शिकवता शिकवता थांबले आणि म्हणाले, “अरे रोजच होतो उशीर तुला, खरं कारण सांग मला.” प्रणव म्हणाला की,
“भाऊ माझा असतो आजारी
मीच करतो मदत सारी
कामे त्याची उरकून सगळी
मग करतो माझी तयारी!”
प्रणवचं बोलणं ऐकून टिळक सरांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, “प्रणव बेटा ऐकून मला बरे वाटले. मदत करणे खूपच चांगले. मग प्रणव वर्गात जाऊन बसला.
मुलांमध्ये कुजबूज सुरू झाली. कारण प्रणवचा भाऊ अर्णव आपल्या शाळेत शिकतो आणि तो तर आज शाळेत आला होता. प्रणव सरांशी खोटे बोलला, त्याचे सर्वांना आश्चर्य वाटले.
दुसऱ्या दिवशी भालेकर सरांचा पहिला तास होता. आजही प्रणव जवळजवळ वीस मिनिटे उशिराच वर्गावर आला आणि सरांना म्हणाला,
“सर मी येऊ का वर्गात
आज उशीर झालाय भलताच
गणित माझ्या आवडीचा
शब्द देतो वेळ पाळण्याचा!”
शिकवता शिकवता सर थांबले आणि म्हणाले, “अरे प्रणव रोजच उशीर होतो तुला, खरं कारण सांग मला.”
प्रणव म्हणाला,
“आई माझी असते आजारी
मीच करतो मदत सारी
कामे तिची उरकून सगळी
मग करतो माझी तयारी!”
प्रणवचं बोलणं ऐकून भालेकर सर म्हणाले, “प्रणव बेटा ऐकून मला बरे वाटले. मदत करणे खूप चांगले.”
मग प्रणव वर्गात जाऊन बसला. मुलांमध्ये कुजबूज सुरू झाली. कारण प्रणवची आई आजच शाळेत येऊन गेली होती. प्रणव सरांशी खोटं बोलतो, हे बघून मुलांना वाईट वाटले.
तिसरा दिवस उजाडला. आज वर्गावर पहिला तास कुलकर्णी सरांचा मराठीचा होता. नेहमीप्रमाणे प्रणव धावतच आला आणि म्हणाला,
“सर मी येऊ का वर्गात
आज उशीर झालाय भलताच
मराठी माझ्या आवडीचा
शब्द देतो वेळ पाळण्याचा!”
शिकवता शिकवता सर थांबले आणि म्हणाले, अरे प्रणव रोजच होतो उशीर तुला, खरं कारण सांग मला. प्रणव म्हणाला,
“बाबा माझे असतात आजारी
मीच करतो कामे सारी
कामे त्यांची उरकून सगळी
मग करतो माझी तयारी”
कुलकर्णी सर प्रणवला म्हणाले, “प्रणव बेटा ऐकून मला बरे वाटले. मदत करणे किती चांगले.”
मग प्रणव वर्गात जाऊन बसला. त्याचा चेहरा एखाद्या विजयी वीरासारखा प्रफुल्लित दिसत होता. आपण रोज सरांना हातोहात फसवतो; पण हे आपल्या सरांना त्याचा पत्ताही लागत नाही, याचे त्याला हसू येत होते. तेवढ्यात ‘अरे प्रणव’ अशी हाक त्याला ऐकू आली. त्याला तो आवाज आपल्या बाबांसारखा वाटला; पण त्याने दुर्लक्ष केले. नंतर पुन्हा ‘अरे प्रणव’ असा मुलींच्या दिशेने आवाज आला. त्याला तो आवाज आपल्या आईसारखा वाटला. आता मात्र तो उभा राहिला. त्याने वर्गात नजर फिरवली अन् त्याला धक्काच बसला. कारण मुलींमध्ये आई आणि मुलांमध्ये बाबा बसले होते. त्यांना बघून प्रणव चांगलाच हादरला आणि म्हणाला, “बाबा तुम्ही आणि इकडे वर्गात कसे? आई तू पण! मला का नाही सांगितलं? इथे तुम्हाला कुणी बोलवले? का बोलवले? प्रणवच्या लक्षात आले सरांनीच आई-बाबांना बोलावले असेल.
आता मात्र प्रणव घाबरला आणि भडाभडा बोलू लागला. आई-बाबा मला माफ करा.
मी सरांशी रोज खोटं बोलत होतो. रोज मित्रांंबरोबर जात होतो. आता नाही जाणार. रोज वेळेवर शाळेत जाईन. मी चुकलो. असे पुन्हा कधीच करणार नाही. त्याचा कान धरत आई म्हणाली, अरे प्रणव तू सरांना नाही, आम्हाला फसवलंस. स्वतःला फसवलंस! आमच्या विश्वासाला तडा दिलास बघ तू! आता मात्र प्रणव मुसमुसून रडू लागला. त्याचे डोळे उघडले. तो म्हणाला की, “सर मला माफ करा. यापुढे कधीच खोटे बोलणार नाही.” प्रणवच्या या वाक्यावर साऱ्या वर्गाने जोरदार टाळ्या वाजवल्या.
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…
मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा…