मुंबई : प्रत्येक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा कामाचा वेळ ८ तासांचा असतो. तर काही ठिकाणी जास्तीत जास्त १० तास कामाचा कालावधी असतो. मात्र आता आयटी (IT) कर्मचाऱ्यांना चक्क १४ तास काम करावे लागणार आहे. आयटी कंपनीने कामात आणखी सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा कामाचा वेळ १४ तास (14 Hours Working) करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कंपनीने कर्नाटक सरकारला (Karnataka Government) प्रस्ताव पाठवला असून सरकार याचा निर्णय घेणार आहे. मात्र कंपनीच्या या निर्णयाला कर्मचाऱ्यांनी निषेध केला असून नाराजीचा सूर मारला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार कर्नाटक शॉप्स अँड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स ऍक्ट, १९६१मध्ये सुधारणा करण्याचा विचार केला आहे. ज्यामध्ये आयटी कंपन्यांना त्यांच्या प्रस्तावाचा दुरुस्तीमध्ये समावेश करायचा आहे. त्यामुळे कायदेशीररित्या कर्मचाऱ्यांचे कामाचे तास १४ तासांपर्यंत वाढवले जातील असे म्हटले आहे. यामध्ये १२ तास आणि २ तास ओव्हरटाइम अशा शिफ्टचा समावेश असेल.
आयटी कंपनीने प्रस्तावात काय म्हटले
आयटी सेक्टरने कामगार कायद्यासाठी पाठवलेल्या नवीन प्रस्तावात म्हटले आहे की, ‘IT/ITeS/BPO क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिवसातून १२ तासांपेक्षा जास्त आणि सतत तीन महिन्यांत १२५ तासांपेक्षा जास्त काम करण्याची आवश्यकता असल्याने त्यासंदर्भात परवानगी दिली जाऊ शकते’. याबाबत सरकारने प्राथमिक बैठक घेतली असून लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळत आहे.
कर्मचाऱ्यांचा तीव्र संताप
कामाचे तास वाढवण्याच्या निर्णयाबाबत कर्नाटक राज्य आयटी आणि आयटीईएस एम्प्लॉईज युनियनकडून (KITU) विरोध करण्यात आला आहे. ‘कामाचे तास वाढवल्यास शिफ्टवर परिणाम होईल. कामगारांच्या शिफ्टची संख्या कमी झाल्यामुळे एक तृतीयांश कर्मचारी बेरोजगार होतील. यामुळे कंपन्यांना सध्या अस्तित्वात असलेल्या तीन शिफ्ट प्रणालीऐवजी दोन शिफ्ट कराव्या लागली आणि यामुळे एक तृतीयांश कर्मचारी कामावरुन काढले जातील’, असे युनियनने म्हटले आहे.