ओंजळ – पल्लवी अष्टेकर
मैं आझाद हूँ’ अशी ब्रिटिशांच्या विरोधात गर्जना करणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै इ. स. १९०६ रोजी मध्य प्रदेशातील अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी व आईचे नाव जगरानी देवी असे होते.
चंद्रशेखर यांचे वडील सीताराम हे स्वभावाने शीघ्रकोपी होते. त्यांची शिस्त फारच कडक होती. त्यामुळे लहानपणी चंद्रशेखरला वडिलांची खूप भीती वाटत असे. त्याची आई जगरानी देवी ही स्वभावाने शांत व प्रेमळ होती. भारत देश पारतंत्र्यात असताना, महात्मा गांधींनी १९२१ साली इंग्रजांविरुद्ध असहकार चळवळ सुरू केली होती. या आंदोलनात काशी विद्यापीठात शिकत असलेल्या एका चौदा-पंधरा वर्षांच्या मुलाने हिरिरीने भाग घेतला. तो स्वभावाने अतिशय धाडसी व निर्भय होता. इंग्रज सरकारचा निषेध करण्यासाठी, सत्याग्रहात भाग घेतलेल्या सर्वांना अटक झाली. त्या सर्वांना दंडाधिकाऱ्यांपुढे उभे करण्यात आले. या सर्व आंदोलनात तो मुलगा लहान होता. त्यामुळे दंडाधिकाऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष गेले.
त्यांनी त्या मुलाला विचारले, “ए, तुझे नाव काय?”
त्या मुलाने उत्तर दिले, “मेरा नाम आझाद है।’’
दंडाधिकारी खारेघाट यांनी पुन्हा त्याला प्रश्न विचारला, “तू राहतोस कुठे?’’
तो म्हणाला, “इंग्रज सरकारच्या तुरुंगात.”
दंडाधिकाऱ्यांना त्याची उत्तरे अपमानकारक वाटली. त्यांनी त्या मुलाच्या अपराधाबद्दल त्याला पंधरा फटके मारण्याची शिक्षा ठोठावली. शिक्षा अंमलात आणण्यासाठी, शिपायांनी त्याला ‘बनारस सेंट्रल जेल’मध्ये नेले. त्या मुलाला फटके मारण्यापूर्वी चौकात बांधले. प्रत्येक फटक्याला त्या मुलाने ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशी गर्जना केली. हा मुलगा हंटरचे फटके न ओरडता, धीराने खात होता. वयाच्या पंधराव्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात उडी मारणाऱ्या या मुलाचे नाव होते-‘चंद्रशेखर तिवारी.’ पण त्या प्रसंगानंतर चंद्रशेखरचे नाव ‘आझाद’ हेच झाले.
आझादांचे प्राथमिक शिक्षण भवरा व उच्च शिक्षण बनारस येथील काशी विद्यापीठात झाले. १९२१ ते १९३२ पर्यंतच्या क्रांतिकारी चळवळीत चंद्रशेखर आझाद आघाडीवर होते. बनारस शहरात क्रांतिकारी संघटना १९०८ पासून कार्यरत होती. बहुतांशी सर्वच क्रांतिकारकांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यांना कधी जेवण मिळत नसे, कधी उपाशी राहावे लागे, तर कधी अर्धपोटी. मग पोट भरण्यासाठी, त्यांनी लहान-मोठी कामे मिळवण्यास सुरुवात केली.
‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ ही संघटना स्थापण्यात व वाढविण्यात चंद्रशेखर आझाद, सच्चिद्रनाथ संन्याल व रामप्रसाद बिस्मिल यांनी हिरिरीने भाग घेतला. या संस्थेच्या कोणत्याही नवीन क्रांतिकार्यात भाग घ्यायला आपल्याला संधी मिळालीच पाहिजे, असे त्यांचे मत होते. या संघटनेचे ध्येय म्हणजे ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र चळवळ, भारतीय जनतेची गुलामगिरीतून मुक्तता व अन्यायाविरूद्ध लढा. बलाढ्य इंग्रजांशी सामना करायचा म्हणजे शस्त्रे हवीत. त्यासाठी निधी जमवायला क्रांतिकारकांनी प्रथम सरकारी पोस्ट, काही श्रीमंत सावकार यांच्याकडे वेश पालटून डाके घातले व त्यातून मिळालेल्या रकमेतून त्यांनी रायफल्स, तलवारी, पिस्तुले व दारूगोळा खरेदी केला. मात्र तेवढ्याने भागणार नसल्यामुळे, जहानपूरला १९२४ मध्ये गुप्तसंघटनेची बैठक भरली.
एके दिवशी पं. रामप्रसाद बिस्मिल हे सहरागपूरहून लखनऊला जाण्यासाठी, प्रवास करीत असताना, त्यांना एक विलक्षण कल्पना सुचली. या रेल्वेतून प्रत्येक स्टेशनला जमलेले पैसे, वसूल व महसुलाची रक्कम रेल्वेने नियमितपणे लखनऊला पाठविली जायची. हा खजिना लुटल्यास, आपल्याला बऱ्यापैकी रक्कम मिळेल व त्यातून क्रांतिकारी चळवळीसाठी शक्तिशाली बॉम्ब बनवता येतील, असा त्यांचा होरा होता. त्याप्रमाणे क्रांतिकारी चळवळीच्या कार्यकारिणीची गुप्त बैठक भरली. या सभेला पं. रामप्रसाद बिस्मिल, भगतसिंग यांचे चुलते स्वर्णसिंग, भगवतीचरण यांची पत्नी दुर्गाभाभी व इतर क्रांतिकारक जमले. सहारणपूर ते लखनौ या गाडी नं. ‘८ डाऊन’मधील सरकारी खजिन्यावर डाका घालून, रक्कम उभारण्याची रूपरेषा ठरविली गेली.
९ ऑगस्ट १९४५चा दिवस. रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, चंद्रशेखर आझाद, मन्मथ नाथ, मुरारीलाल, केशव चक्रवर्ती, मुकुंदीलाल, राजेंद्र लाहिरी, बनवारीलाल ठरल्याप्रमाणे लखनऊपुढच्या काकोरी रेल्वे स्थानकावर आले. ते सर्व क्रांतिकारक कुणाला संशय येऊ नये म्हणून वेगवेगळ्या बाकांवर बसले. त्यातील काही जण दुसऱ्या, तर काही जण तिसऱ्या वर्गाच्या डब्यात शिरले. दुसऱ्या वर्गाच्या डब्यात बसलेल्या राजेंद्र लाहिरींनी गाडीची साखळी ओढली. गाडी थांबली. दहा क्रांतिकारकांनी बाहेर उड्या टाकल्या. त्यांच्या हातात मौजर पिस्तुलं होती. तोपर्यंत आझाद व अशफाक यांनी गार्डच्या डब्यात प्रवेश केला. तेथील शिपायाची बंदूक काढून घेऊन, त्याला निशस्त्र केले. मुकुंदीलाल, मन्मथनाथ व ठाकूर रोशनसिंग त्यांच्या सहाय्याला धावले. डब्यातील लोखंडी तिजोरी डब्याबाहेर लोटून देण्यात, ते यशस्वी झाले. तिजोरी भरभक्कम असल्यामुळे, ती लवकर फुटत नव्हती. तेवढ्यात इतर कोणी आले किंवा इंग्रजांची गस्त आली तर सर्व जण पकडले जाण्याची शक्यता होती. अशफाकनी आपले पिस्तूल मन्मथनाथ गुप्तांकडे दिले व हातात हातोडा घेऊन ते तिजोरीवर तडाखे मारू लागले. इतक्यात एक आगगाडी लांबवरून इकडेच येत आहे, हे समजले.
तेवढ्यात रामप्रसाद बिस्मिल म्हणाले, “अरे, ही तर पंजाब मेल असणार.” त्यांनी अशफाकला तिजोरीवरील तडाखे मारण्याचे थांबवायला सांगितले. प्रत्येकाने आपापली हत्यारे बेमालूमपणे लपविली. मात्र रेल्वेचा इंजिन ड्रायव्हर, त्याचा मदतनीस गार्ड व सुरक्षा रक्षक यांनी आरडा-ओरडा करून पंजाब मेलवाल्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ नये, यासाठी क्रांतिकारकांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून, गप्प बसायला लावले. नेहमीप्रमाणे पंजाब मेल अंधारात पलीकडच्या लोहमार्गावरून धाड-धाड आवाज करत निघून गेली. सर्व क्रांतिकारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आता तिजोरी फोडण्यासाठी, अशफाक यांच्या मदतीला चंद्रशेखर आझाद धावले. दोघांनी बेभानपणे तिजोरीवर घाव घालण्यास सुरुवात केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले व तिजोरीला भगदाड पडले. थैल्या बाहेर काढण्यात आल्या. अंधाराचा फायदा घेऊन, ते मुद्दामच लखनऊच्या विरुद्ध दिशेला गेले.
भारतातील इतिहासात ‘काकोरी रेल्वे दरोडा’ अद्भुत घटना मानली गेली. त्यामुळे ब्रिटिश सरकार हादरले; परंतु ब्रिटिशांनी ‘काकोरी कटाचा’ गंभीर आरोप क्रांतिकारकांच्यावर ठेवला. इंदुभूषण हा व्यक्ती देशद्रोही निघाला. या खटल्यात हॅमिल्टन जस्टिसने तीन जणांना फाशी, काहींना जन्मठेप व काहींना मुदतीचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावल्या. पुढे क्रांतिकारकांनी लाला लजपतराय या देशभक्ताच्या खुनाचा बदला घेण्यासाठी, सँडर्स या इंग्रज डे. सुपरिडंट ऑफ पोलीस यांची हत्या केली. या कटात सामील असलेल्या क्रांतिकारकांना इंग्रजांनी अटक करून शिक्षा ठोठावल्या. २७ फेब्रुवारी १९३१ रोजी आल्फ्रेड पार्कमध्ये चंद्रशेखर आझाद सकाळी आपल्या सहकाऱ्यांना भेटायला आले होते. पूर्वी आझादांच्या संघटनेत काम करणारा वीरभद्र तिवारी ब्रिटिशांना फितूर झाला. पोलिसांनी आझादांवर गोळीबार केला. त्यानंतर आझादांनी भरपूर प्रतिकार केला. शेवटी ‘मी आझाद आहे व आझादच राहणार’ या प्रतिज्ञेला अनुसरून त्यांनी आपल्या कानशिलात मौंजर पिस्तुलातून गोळीबार झाडली. ‘मरावे परी कीर्तीरूपी उरावे’ ही उक्ती सार्थ केली.