प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
आयफोन’ या शीर्षकावरून तुमच्या मनात खूप वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आल्या असतील; पण मी कोणत्याही आयफोनची जाहिरात करणार नाही. मला काही वेगळेच सांगायचे आहे, त्याचा प्रयत्न करणार आहे. माझी मदतनीस (जिला आपण कामवाली म्हणतो…) ती घरी आली आणि कपडे भिजवायला बाथरूमकडे गेली. इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजली. मी तिला आवाज दिला, “बाई…”
“ऐकला आवाज मी, नको त्यावेळेस मेला हा आयफोन वाजतो.”
ती म्हणाली आणि “आयफोन हा शब्द ऐकून, मी कान टवकारले.”
“बाई, तुमच्याकडे आयफोन आहे?”
फोनवर बोलणं झाल्यावर, हातात फोन घेऊनच, बाई स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघरात शांतपणे भांडी घासताना, मी हॉलमधूनच मोठ्या आवाजात विचारले. गेली पाच मिनिटे, आपल्या बाईकडे आयफोन असल्याचे, माझ्या मनामध्ये विलक्षण कुतूहल निर्माण झाले होते, ते मला शांत बसू देईना.
“होय, माझ्याकडे आयफोन आहे.”
ती सहज उत्तरली.
आता मात्र उठून, मी स्वयंपाकघरात गेले.
“कोणी दिला?”
“नवऱ्याने.”
बाई हसून म्हणाली आणि मी नजरेने इकडे-तिकडे तिचा आयफोन शोधत राहिले. ओल्या हातानेच डाव्या बाजूस ठेवलेला तिने तिचा मोबाइल उंचावला आणि म्हणाली,
“आय फोन म्हणजे आयफोन.”
मी तर फोनकडे पाहिले. साधारण हजार रुपयांचा तोही अतिशय जुना, स्मार्ट नसलेला मोबाइल पाहून आम्ही दोघेही हसू लागलो.
“काय बाई तुम्ही इंग्रजी झोडायला लागलात?”
मी हसून विचारले.
“होय, सातवीपर्यंत थोडेफार शिकले की इंग्रजी. आता मुलंही शिकवतात.”
ती म्हणाली. मला या बाईचे खूप कौतुक वाटते. नवऱ्याचे दारू पिणे, छळणे, नोकरी-धंदा न करणे आणि धुणे-भांड्याची कामे करणाऱ्या बायकोकडूनच पैसे घेऊन परत परत दारू पिणे, या असंख्य स्त्रियांसारख्या समस्यांना बिचारी तोंड देत आहे. वाढत्या वयातील मुले आणि त्यांच्या विविध मागण्या तसेच खाण्या-पिण्याच्या समस्या, शिक्षणाच्या समस्या, गावभेट-नातेवाइक-लग्नकार्य इत्यादींसाठी लागणारा पैसा यांमुळे बिचारी त्रासून गेलेली आहे, तरी ‘चलती का नाम गाडी…’ सारखी सकाळी उठून हसऱ्या चेहऱ्याने माझ्या घरात वेळेवर येऊन व्यवस्थित काम करते.
अलीकडे आपल्याकडे भरभरून सगळे काही असूनही सारखेच रडणारी, उदास असणारी, दुःख उगाळणारी माणसे आपल्याला दिसतात. आपल्याकडे जे आहे, त्याविषयीचा आनंद साजरा करायचा नाही, तर जे नाही त्यासाठी घरातल्यांना, नशिबाला नाही, तर देवाला दोष देत ते जगत असतात. अशा माणसांच्या संपर्कात आपण आलो की, संपूर्णपणे नकारात्मकता आपल्यातही प्रवेश करते आणि माझी जी मदतनीस आहे, तिच्यासारख्या माणसांच्या संपर्कात आल्यावर आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्याच गोष्टींचा अभाव त्यांच्याकडे असतो. त्यांचे अभावग्रस्त जीवन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्याला माहीत असते; पण त्यांच्या बोलण्यातून त्याचा कधी उल्लेख होत नाही, याचेही नवल वाटते.
आयुष्यात भेटलेला प्रत्येक माणूस काही तरी शिकवून जातो. आपणच तितके नितळ असण्याची गरज आहे की, प्रत्येक चांगली गोष्ट आपल्या आत झिरपेल. प्रत्येकाला वाटते की, जग सुंदर असायला हवे. हे सुंदर जग आपणच निर्माण करू शकतो. आपणच आपल्यामधील नकारात्मकता अनेक चांगल्या सकारात्मकतेने खोडून काढू शकतो. आपल्याला भेटलेल्या प्रत्येक माणसाशी सकारात्मकतेने वागू शकतो. अनेक चांगली उदाहरणे देऊन, त्याची जीवनाकडे बघण्याची दृष्टी सकारात्मकतेकडे वळवू शकतो.
एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करायची उभारी येईल. आशावाद वाढेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाकडे ‘आयफोन’ असण्याची गरज नाही; परंतु आय (माझा स्वतःचा) फोन ( मोबाईल) असेल तरी त्याविषयी कृतज्ञता बाळगायची मनोवृत्ती मात्र हवी, इतकेच!
pratibha.saraph@ gmail.com