मुंबई: भारतात सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. उत्तराखंडपासून ते महाराष्ट्रापर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर काही राज्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने आज म्हणजेच २१ जुलैला कर्नाटक, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून देशातील ५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात आणि गोवा येथे काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
तसेच देशात मध्य आणि पश्चिमेकडील राज्यामध्येही जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात दमदार
राज्यातही पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातही पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज आहे.