Gurupournima : गुरू एक जगी त्राता

Share
  • विशेष : प्रा. मीरा कुलकर्णी

गुरू ईश्वर स्वरूपच असल्याने शिष्यासाठी गुरू हीच श्रद्धा, गुरू हीच उपासना व गुरू हीच सेवा आहे. त्याने अखंडपणे काया, वाचा, मनाने गुरुभक्ती करावी, कारण गुरू आत्मोपदेश देऊन त्याचा आत्मोद्धार करतात. गुरू हेच सर्व श्रेष्ठ आहेत. गुरूंच्या पेक्षा ईश्वरसुद्धा श्रेष्ठ नाही. गुरू हेच जिज्ञासूच्या जीवनातील अंतिम व अत्युत्तम तपस आहे. आत्मज्ञान प्रदान करून जीवाचा उद्धार करणाऱ्या गुरुसेवेपेक्षा कोणतेही श्रेष्ठ तपस नाही.

“गुरू माझा मायबाप, गुरू माझा श्वास,
अज्ञानाच्या अंधारी तो, तेजोमय प्रकाश.”

असा आपल्यातल्या स्वत्त्वाचा परिचय करून देणारा… अंधारातही दिशा दाखवणारा… आणि ज्याच्या मार्गदर्शनाने, आशीर्वादाने आपले विचार समृद्ध होतात असा आपल्या जीवनाचा दिशादर्शक तो गुरू. या गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आषाढी पौर्णिमा म्हणजे व्यासपूजनाचा दिवस.
‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्’ हे वचन
प्रसिद्ध आहे.
असं म्हणलं जातं की, अशी एकही गोष्ट नाही, जिला व्यासांच्या विचारांनी स्पर्श केला नाही. त्यांनी सगळ्या विचारांचे संकलन करून, संस्कृतीचा ज्ञानकोश रूप असा महाभारत ग्रंथ आपल्याला दिला. भगवान श्रीकृष्णांनीही ‘मुनीनामप्यहं व्यास:’ असे म्हणून त्यांना गौरवले आहे म्हणूनच संस्कृतीचा प्रचार करणाऱ्या सर्वांना ‘व्यास’ या नावाने संबोधले जाते आणि हा विचार ज्या ‘पीठा’वरून सांगितला जातो, त्याला ‘व्यासपीठ’ असे म्हणले जाते. त्यामुळे व्यासपीठावरून बोलताना भाषा, वाणी स्पष्ट, शुद्ध असावी; पण बोलणारा सरस्वतीचा खरा उपासक असावा, अशी अपेक्षा असते.

व्यासांनी ‘व्यक्तीचा मोक्ष’ आणि ‘समाजाचा उद्धार’ या दोन्हीकडे आपलं लक्ष वेधलं म्हणून ते समाजाचे गुरू मानले गेले आणि ही व्यासपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होऊ लागली.

या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि आपल्या कर्तव्यात यशस्वी होऊन खऱ्या अर्थाने गुरूला गुरुदक्षिणा द्यावी, हे अपेक्षित असतं. आपल्या जीवनाला आकार देणारे आपणच असतो; पण त्या मार्गाचा रस्ता दाखवण्याचं काम गुरू करत असतो. आपल्या स्वतःमधल्या स्वत्त्वाचा परिचय होणं, हे आपल्या प्रगतीसाठी गरजेचं असतं. गुरू नेमकं हेच काम करतो. आपल्याला सुखाची परिभाषा गुरूमुळे समजते. हे सुख मिळण्यासाठी आपल्याला आत्मज्ञान होणे म्हणजेच स्वतःमध्ये असलेल्या क्षमतांची, गुणांची पारख होणे आणि त्या अानुषंगाने त्या विषयात ज्ञानी होणं गरजेचं असत. अशावेळी कधी मातृतुल्य भावाने, तर कधी अधिकार वाणीने गुरूने केलेलं मार्गदर्शन… तर आपल्या पाठीवर हात ठेवत, आपल्याला दिलेला धीर आणि वेळेला खंबीरपणाने आपल्या सोबत उभं असणं या सगळ्या भूमिका गुरूच्या ठायी एकवटलेल्या असतात. मग हा गुरू कोणत्याही रूपात असो. आपल्या जीवनात आपल्यावर संस्कारांचं शिंपण करणारी आपली आई आपला पहिला गुरू असते, हे निर्विवाद सत्य आहेच; पण त्यानंतर आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर आपल्याला नवं काही ज्ञान देणारे …वेगळ्या दृष्टीने विचार करायला प्रवृत्त करणारे… आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणारे, असे असंख्य गुरू टप्प्याटप्प्यांवर भेटत राहतात. ‌‌‍परिस्थितीवर मात करून विशेष प्रावीण्यासह एखादी पदवी संपादन करणारा विद्यार्थी असो किंवा आपल्या अपंगत्वावर मात करून हे जीवन सुंदर आहे असं सांगत, त्याचा आनंद घेणारी एखादी व्यक्ती असो, कठोर परिश्रमांनी एखादं ध्येय कवेत घेणारी एखादी व्यक्ती किंवा स्वतःचं कर्तृत्व आणि गुणवत्ता सिद्ध करत एखाद् नवं क्षेत्र पादाक्रांत करणारा एखादा ध्येयासक्त असो हे सगळे आपल्या आयुष्याला दिशा देणारे गुरूच असतात.

‌खचलेल्याला धीर देणं, दुःखात व्यतीत असलेल्याला त्या क्षणी आधार देणे किंवा दिशाहीन व्यक्तीला योग्य रस्त्यावर आणणे हे सगळं काम वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या पद्धतीने जो करतो तो गुरू असतो.

“सुखाच्या क्षणात, व्यथांच्या घणात
उभा पाठीशी एक अदृश्य हात”
अशी प्रेरक शक्ती जी त्या, त्या क्षणी आपल्याला बळ देते… ऊर्जा देते… आपली उर्मी वाढवते… आणि आपल्याला शारीरिक, मानसिक भक्कम आधार देते ती शक्ती… मग ती दृश्य स्वरूपात असो किंवा अदृश्य स्वरूपात गुरूच असते.

लाखो अनाथांची माय होणाऱ्या सिंधुताई…. किती तरी कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंदवन फुलवणारे बाबा आमटे. …असंख्य कुपोषित बालकांना नवक्षितीज दाखवणारे डॉ. अभय बंग आणि राणी बंग असोत किंवा व्यसनमुक्तीच्या विळख्यातून अनेकांना नवसंजीवन देणारे अनिल अवचट, मुक्ता पुणतांबेकर यांच्यासारख्या व्यक्ती असोत…! समाजाच्या हितासाठी सर्वस्व झोकून देत आपणही समाजाचं काही देणं लागतो, हा आदर्श वस्तुपाठ आपल्यासमोर ठेवणारे हे सगळे त्या त्या क्षेत्रातले आपले गुरूच नव्हेत काय..!

“करी मूर्त जो अमूर्ता
गुरू एक जगी त्राता.”
ही गुरूची महती या अर्थाने आपण जाणून घ्यायला हवी. आपल्याला सुखाची परिभाषा समजण्यासाठी, सुख म्हणजे काय हे आधी कळायला हवं आणि ते समजण्यासाठी ज्ञानी होणं महत्त्वाचं आहे. हे ज्ञान विविधांगानी आपल्यापर्यंत जे पोहोचवतात, ते ते सगळे आपले गुरू आहेत. ही गुरूची व्यापक परिभाषा आपण सर्वांनी
स्वीकारली पाहिजे.
सध्याच्या गतिमान काळामध्ये मानवी जीवनावर असणारा माध्यमांचा प्रभाव वाढत आहे. मनाला, विचारांना विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी भवतालात घडत आहेत. सगळं काही इस्टंट मिळायच्या काळात मेहनतीने, अभ्यासाने, कष्टाने काही मिळवण्याची, धडपड करण्याची वृत्ती कमी होताना जाणवते. अशा काळात लोकजीवन आनंदी, निरामय होण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या गुरूची अत्यंत आवश्यकता असते.

कवी मंगेश पाडगावकर
‘दर्शन’ कवितेत म्हणतात,
“मी कधीच नाही म्हटले तू दे मज दर्शन.”
म्हणजे जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, निसर्गाच्या अनेक रूपात मला जर प्रत्यक्ष वेगवेगळ्या गोष्टींचे ज्ञान होत असेल, तर निसर्ग हा माझा सगळ्यात मोठा गुरू आहे. परमेश्वर आहे. ही भावना पाडगावकर त्या कवितेमध्ये व्यक्त करतात. सर्वांना समान न्याय देत ऊन, वारा, पाऊस अशी संकटं झेलत, सर्वांना सावली देणारा, फुलं-फळं यांची बरसात करणारा आणि जगण्यासाठी प्राणवायू देणारा निसर्ग हा पाडगावकरांना गुरूच्या, परमेश्वराच्या रूपात दिसतो म्हणूनच ओहोळाला पोटी घेणाऱ्या गोदावरीला तीर्थ म्हटलं जातं. कस्तुरी शेजारी दुर्गंधाला कधीही थारा नसतो. गुरूच्या सान्निध्यात असल्यावर गुरू मातृतुल्य वृत्तीने, तर कधी अधिकारवाणीने आपल्या शिष्याला योग्य विचारांसह दिशादर्शन करतो. मात्र त्यासाठी शिष्याची गुरूवर भक्ती हवी,
निष्ठा हवी.
तुझ्या कृपेची आगाध थोरी |
पांगळा ही चढे गिरी ||
मुका सभेमाझारी |
देई व्याख्यान अस्खलित ||
गुरुकृपेच्या या श्लोकांचा भावार्थ असा की, आपल्यात आत्मविश्वास निर्माण करून, जगाच्या प्रवाहात ध्येप्राप्तीसाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन करून पाठवणारा गुरू असतो.

सतत प्रश्न विचारणारा अर्जुन होता म्हणून भगवद्गीतेची निर्मिती झाली. कृष्ण-अर्जुनाची ही गुरू- शिष्याची जोडी आदर्श शिष्य कसा असावा, हे आपल्याला समजावून सांगते. रामावर नितांत भक्ती करणारा मारुती नेहमी त्याच्या चरणापाशी स्थिरावला. ही नम्रता, विनयशीलता शिष्याठाई असावी याचे हे उत्तम उदाहरण. छत्रपती शिवरायांना समर्थ रामदास स्वामींनी शिष्य म्हणून जे मार्गदर्शन केलं, त्याचा इतिहास तर शब्दातीत आहे. ‘त वरून ताकभात ओळखावा’ त्याप्रमाणे अत्यंत सूचक भाषेमध्ये समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना नेहमी मार्गदर्शन केलं आहे.

हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा समर्थ रामदासांचा मानस आणि शिवरायांचा मानस एक होता, हे एकच ध्येय या गुरू-शिष्य जोडीचे होते. समर्थ रामदास स्वामींनी महाराजांना सांगितलं होतं, “राजे आपल्यावर अनुग्रह करतो; पण इतर शिष्यांपेक्षा आपलं स्थान वेगळे आहे. आपण आमचे शिष्य असला, तरी रयतेचे राजे आहात म्हणून राजेपण विसरून वारंवार आमच्यामध्ये मिसळू नका.” गुरू हा शिष्याला त्याच्या कर्तव्याची आणि कर्तृत्वाची अशी जाणीव करून देतो.

एकूणच आपल्या संस्कृतीने म्हणूनच वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या गुरूचे पूजन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करण्याचे औचित्य साधले आहे. आज काळानुसार या गुरूंचे स्वरूप बदलले आहे. टेक्नोसॅव्ही असणाऱ्या या जगाला गुगली मावशीने कितीही ज्ञान दिले, तरी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यावरची झापड उघडून आपल्याला सतर्क करणारे गुरू महत्त्वाचेच.

हिरे गारा एक्या ठाई
मिसळल्या असती जगा ठायी
पारखी तो निवडून घेई
गार टाकून हिर्याते.
पारख्याच्या हाती सोपवण्यासाठी तावून-सुलाखून अचूक मूर्ती घडवण्याचं काम गुरू करतो. गुरू कुंभार असतो आणि शिष्य कुंभ. शिष्याच्या जीवनाला आकार देण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक, प्रेम करत, प्रसंगी थापट्या मारत आकार देणाऱ्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. कृपादृष्टी झाली की, बुद्धी ग्रहणशील होते आणि गुरूच्या आशीर्वाचनाने, कृपादृष्टीने मनाची मलीनता संपते.

गुरुपूजन हे ध्येय पूजन असतं. जीवनातल्या ध्येयाला साकार स्वरूप देण्यासाठी गुरूची आवश्यकता असते. जेव्हा ध्येय असतं, तेव्हा संयम असतो आणि ध्येयाच्या जवळ जाण्यासाठी कष्ट करण्याची प्रवृत्ती असते.

भारतीय संस्कृतीने सद्गुरूचे पूजन नेहमी केलं आहे; कारण आपली भारतीय परंपराच गुरुपरंपरा आहे. मी सॉक्रेटिसचा शिष्य आहे, असं म्हणण्यात प्लेटोला अभिमान वाटायचा आणि प्लेटो माझा गुरू आहे, हे सांगण्यात अॅरिस्टॉटल स्वतःचे जीवन धन्य मानत असे. गुरू द्रोणांनी अर्जुनाला मार्गदर्शन केलं. एकूणच ब्रह्माचा आनंदरूपी, निर्लेप, परम सुख देणारा ज्ञानरूप असा जो ईश्वर तत्त्वाचा अंश आहे, तो गुरू असतो.

कबीर तर गोविंदाला दाखवणारे गुरू …हे गोविंदाहून श्रेष्ठ आहेत असे म्हणतात.
आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एवढेच लक्षात ठेवूया की, गुरुपूजन म्हणजे सत्याचे पूजन, ज्ञानाचे पूजन, अनुभवांचे पूजन. ते ज्या ज्या व्यक्तीच्या, प्रसंगाच्या, ठिकाणाच्या ठाई एकवटलं आहे त्या सर्व गुरूंना शतशः वंदन करून मागणं मागूया.

अचिंत्य जगताप्रति कृती तुझी
न कोणा कळे.|
असो खलहि केवढा तव-कृपे
सुमार्गी वळे ||
उणे पुढति ये तुझ्या खचित
रत्नचिंतामणी |
शिरी सतत माझिया वरदहस्त ठेवा झणी ||

Tags: Gurupournima

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

5 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

5 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

6 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

7 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

8 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

8 hours ago