माधव माझ्यापेक्षा बारा वर्षांनी लहान आहे; पण माझा खूप विश्वासू मित्र आहे. मुलुंड २०-२५ वर्षांपूर्वी, मुलुंड पूर्व नि पश्चिम एवढंच विभागलं नि पूर्व द्रुतगती मार्ग आला की, रानोमाळ होई पलीकडला भाग. आता तशी परिस्थिती नाही. गणेश टॉकीजजवळ माधवचे ऑफिस होते. विश्वनाथ खांदारे हा पोरसवदा तरुण ते सांभाळी. माधव तेव्हा ‘मुलुंड नागरिक’ हे पाक्षिक काढी. पुढे ते साप्ताहिक झाले. मी आणि सर्वश्री भा. ल. महाबळ त्यात लिहीत असू. अगदी नियमित. आम्हाला मुक्त स्वातंत्र्य होते. अक्षरांवर मनापासून प्रेम ना! पैशांची हाव हाव अजिबातच मनी नव्हती. पुढे २००५ मध्ये विश्वकोश आयुष्यात आला. माधवने १ ते १७ खंड स्कॅन केले आणि सीडींचा संच एका अत्यंत देखण्या बॉक्समध्ये घातला. इतका देखणा बॉक्स की, बघताच घ्यावा वाटला. त्याचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांनी केले. सीएम साहेब होते मा. विलासराव देशमुख. त्यांनी सुद्धा माधवचे कौतुक तोंड भरून केले.
वाड बाईंनी काय केले? रात्रं-दिवस काम करून, त्यातल्या प्रदीर्घ नोंदी थोड्या कमी विस्तृत केल्या. जेणेकरून त्या सीडीत सामावल्या जाव्यात; पण गाभा कायम राहावा. महत्त्व कमी (नोंदीचे) होऊ नये. हे अवघड काम मी मेहनतीने बसून केले आणि ते जमले. नंतर माझ्या चुकांवर बारीक नजर ठेवलेल्या विद्वान लोकांमध्ये त्यात चूक सापडली नाही, हे माझे कर्मफल; पण सीडी भारतभर गेली. कारण की यूपी, बिहार, काश्मीर येथे महाराष्ट्र मंडळात गेले, तेथे माधवची सीडी होती. माधवचे काम भारतभर पोहोचले. हे आमचे भाग्य.
पैशांचा प्रश्न आला.
“आधी परवानगी घेतली होती का?” सचिवांनी विचारले.
“नाही.”
“पूर्वपरवानगी नसेल, तर रक्कम मिळणे दुरापास्त आहे.”
“मग आता हो?”… इति मी.
“स्वत:चे भरा.”
“ते ओघाने आलेच.” मी पूर्ण निराश.
पण अंधुकशी आशा नसताना माधव म्हणाला, “बाई, तुम्ही निराश होऊ नका. एकही पैसा नाही मिळाला तरी चालेल.”
“माधवा…” मला रडूच फुटले. ५२ हजार रुपये खर्च झाले होते नि हा म्हणतोय एकही रुपया नाही मिळाला तरी चालेल? माणसाचे मन किती मोठे असावे?
पण मी सी. एम. साहेबांना विचारायचे ठरविले नि त्याप्रमाणे केले. “कागदावर लिहून द्या ताई. मी झटशीर सही करतो.”
मा. विलासरावांनी सही केली नि अशी कार्योत्तर मंजुरी मिळून, माधवचे पैसे मिळाले. वाईच्या गणपती बाप्पांचे आशीर्वाद. मी कर्मयोगिनी असले तरी माझ्या श्रद्धास्थानी श्रीगणेश, श्रीराम आहेत. आम्ही काय कुणाचे घेतो? तो राम आम्हाला देतो यावर माझा विश्वास आहे.
माधवाचे नंतर ते कार्यालय बंद झाले. भा. ल. महाबळ आणि मी नंतर अन्य वृत्तपत्रांमध्ये लिहू लागलो. अक्षरमित्र ना दोघे!
एक दिवस एक गोड मुलगी पहिल्या वर्गाच्या डब्यात उभी दिसली. ८.१६ची माझी उदयाचल हायस्कूल गोदरेज येथील नोकरीच्या काळातील रोजची लोकल. “तुम्हाला माधव आवडतो ना? त्याची मी बायको.” तिने गोड हसून म्हटले. मला खूप आनंद झाला. मग आमची मैत्रीच झाली. दुर्दैवाने ही साथ देवाने काढून घेतली. माधव एकटा झाला. मला अपार दु:ख झाले. मग तो बदलापूरला निघून गेला. प्रेम मात्र तरोताज राहिले. आम्हा दोघांचे.
आता त्याने एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. ‘मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा…’ पोस्ट खातं नव्हतं, रेल्वे नव्हती, मुंबईसारख्या शहरात विकास शून्य होता. पडीक, उजाड सर्वत्र…!
पारतंत्र्याची काळी बाजू, इंग्रज लोकांचे जुलूम, दडपशाही या गोष्टी विद्यार्थीदशेत आपण घोटल्या; पण ब्रिटिशांनी केलेली विधायक कामे, काही स्फूर्तिदायक घटना, उद्बोधक विचार यांचाही कंगोरा पुस्तकात विखुरला आहे. इतिहासाचे हे विधायक कंगोरे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
‘मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा…’ म्हणूनच अत्यंत वाचनीय झाले आहे. हे यश माधव शिरवळकर या लेखकाचे आहे. त्याचे श्रेय त्याला मुक्त हस्ते देऊया आणि म्हणूया “माधवजी, आप लिखते रहिये. हम पढते जाएँगे!”
माधव शिरवळकर यांचे विश्वकोशास अनमोल योगदान आहे. कोणताही गाजावाजा न करता, पाठीशी उभ्या राहणाऱ्या या पुत्रवत मित्रास माझ्या प्रेमळ शुभेच्छा आणि भरभरून आशीर्वाद!
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…