
पुणे : सध्या देशभरात आगामी विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात भाजपाचे (BJP) महाअधिवेशन आयोजित केले होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरील नेते तसेच मंत्र्यांची उपस्थिती होती. त्यासोबत देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीष महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे, यांच्यासह भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी देखील अधिवेशनाला हजेरी लावली होती. या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत पसरवलेला खोटा नॅरेटिव्ह विधानपरिषद निवडणुकीत फुटला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
भाजपाच्या महाअधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला. ते म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटा प्रचार केला. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत त्यांच्या खोट्या नॅरेटिव्हचा फुगा फुटला आहे. मी आज कार्यकर्त्यांना सांगतो, की तुम्ही आजची तारीख लिहून ठेवा. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे'.
भाजपाने २०१३ रोजी पुण्यातील याच ठिकाणी महाअधिवेशन घेतले होते. त्यानंतर २०१४ रोजी महायुतीचे सरकार निवडून आले होते. आताही भाजपाने याच ठिकाणी अधिवेशन घेतले असल्यामुळे पुन्हा विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचेच सरकार येईल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
खोट्याचा फुगा फोडायला आम्ही सुरुवात केलीय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाची सीमा वाढवली आहे. परंतु हे निवडून आले तर आरक्षण रद्द करणार असा विरोधकांनी एक खोटा नॅरेटीव्ह तयार केला आहे. त्यामुळे खोटं फार काळ टिकत नाही. खोट्याचा फुगा आम्ही फोडायला सुरुवात केली आहे. विधानपरिषद निवडणुकीत आम्ही त्यांच्या फुग्याला टाचणी लावण्याचे काम केले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.