Saturday, April 19, 2025
HomeदेशKedarnath landslide : केदारनाथमध्ये मोठी दुर्घटना! दरड कोसळल्याने तिघांचा मृत्यू

Kedarnath landslide : केदारनाथमध्ये मोठी दुर्घटना! दरड कोसळल्याने तिघांचा मृत्यू

अनेक जण जखमी असल्याची माहिती

डेहराडून : केदारनाथमधून (Kedarnath) एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. केदारनाथ मंदिराकडे जात असताना मार्गातील चिरबासाजवळ दरड कोसळली (Landslide). सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. यात तीन जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन यात्रेकरू महाराष्ट्रातील आहेत. जखमींना उपचारासाठी गौरीकुंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलचे (SDRF) एक पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे.

रुद्रप्रयाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धाम ट्रेकिंग मार्गावर सकाळी साडेसात वाजता चिरबासा परिसराजवळ हा अपघात घडला जेव्हा डोंगरावरून ढिगारा आणि जड दगड खाली पडू लागले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अद्याप बचावकार्य सुरु आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील किशोर अरुण पराटे (वय ३१) नागपूर महाराष्ट्र, सुनील महादेव काळे (वय २४) जालना महाराष्ट्र यांचा समावेश आहे.

चिरबासा जोखमीचा मार्ग

गौरीकुंड ते केदारनाथ असा १६ किलोमीटर अंतराचा पायी मार्ग आहे. यादरम्यान अनेकदा भूस्खलनाच्या घटना घडत असतात. चिरबासा हा भूस्खलन होण्यासाठीच ओळखला जातो. पावसामध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत असते. मलबा, मोठे दगड पडल्याने अपघात होत असतात. मागच्या वर्षी अशाच अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच हा मार्ग जोखमीचा म्हटला जातो.

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केदारनाथ धामच्या दर्शनासाठी जात असलेल्या मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. “अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे, मी या संदर्भात सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. मृतांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची देव शक्ती देवो.”, असं मुख्यमंत्र्यांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -