Sunday, August 24, 2025

Leptospirosis : रायगड जिल्ह्यात आढळले लेप्टोस्पायरोसिसचे १६८ रुग्ण!

Leptospirosis : रायगड जिल्ह्यात आढळले लेप्टोस्पायरोसिसचे १६८ रुग्ण!

अलिबाग : रायगड जिल्ह्यात (Raigad News) जानेवारी २०२२ ते जून २०२४ पर्यंत लेप्टोस्पायरोसिसचे (Leptospirosis) १६८ रुग्ण सापडले असून, त्यापैकी १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

लेप्टोस्पायरोसिसचा सर्वसामान्यतः हा आजार म्हणजे एक सौम्य संसर्ग असून, तो गंभीर आजाराला कारणीभूत ठरू शकतो किंवा काही दुर्मिळ केसेसमध्ये रुग्णाचा मृत्यूदेखील ओढवू शकतो. रायगड जिल्ह्यातील उरण, श्रीवर्धन, पोलादपूर, वगळता इतर तालुक्यात या लेप्टोस्पायरोसिस आजाराचे रुग्ण सापडले असून, अलिबाग, मुरुड, पेण, सुधागड, रोहा आणि तळा तालुक्यात रुग्ण दगावलेले आहेत. रस्त्यावरील खड्डे, मोकळे भूखंड, तसेच सखल भागात पाणी साचत असते. दूषित पाण्यामध्ये लेप्टोस्पायरोसिस या जीवाणूजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात स्वच्छता पाळावी, पाणी साचू देऊ नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. दूषित पाणी व मातीशी नागरिकांनी संपर्क टाळावा. आपले घर, परिसर स्वच्छ ठेवावा, वैयक्तिक स्वच्छता टिकवून पावसाळ्यात घरासभोवताली जीवजंतूंची निर्मिती होणार नाही, यात्री खबरदारी घेणे आवश्यक आहे.

साचलेल्या पाण्यातून होतो संसर्ग

अस्वच्छ पाण्याशी नागरिकांचा संपर्क आल्यास पायांच्या भेगांमधून हे जिवाणू प्रभाव पाडू शकतात. त्यामुळे खराब पाण्यापासून पावसाळ्याच्या काळात खबरदारी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या साचलेल्या पाण्यात वावरणे टाळावे, इतर वेळेस पाण्यात उतरताना वाटरप्रूफ ड्रेसिंग प्रतिबंधात्मक ठरते. कावीळ, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावामुळे डोळे लाल होणे आणि त्यानंतर किडनी, यकृत निकामी होणे किंवा मेंदूज्वर असे आजारदेखील होऊ शकतात. पावसाळ्यामध्ये दहा-पंधरा दिवसांपेक्षा अधिक दिवस दूषित पाणी साचल्याने त्याचा विपरीत परिणाम नागरिकांवर होऊ शकतो. दरम्यान, जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या आजाराचे रुग्ण आढळत नसल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत.

आजाराची प्रमुख कारणे लक्षात घेतल्यास, लेप्टोस्पायरोसिस हा आजार जिवाणूमुळे होतो. व्यक्तीच्या तोंडातून, नाकातून, डोळ्यातून किंवा त्वचेच्या फोडातून जिवाणू शरीरात प्रवेश करतात. दूषित पाण्यात पोहणे, अस्वच्छ भागात राहणे ही कारणे आहेत. साचलेल्या दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे व्यक्तीला लेप्टोस्पायरोसिस हा आजार होण्याची शक्यता असते. पावसाळ्याच्या दृष्टीने योग्यती काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतोवर साचलेल्या पाण्यातून चालूच नये, तसेच काही लक्षणे दिसल्यास वेळीच निदान करणे गरजेचे असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांनी सांगितले.

लक्षणे सौम्य असली, तरी दुर्लक्ष नको

खूप ताप येणे, थंडी वाजणे, पुरळ येणे, डोकेदुखी, सांधेदुखी अशी सौम्य लक्षणे दिसून येऊ शकतात. काहीवेळा पोटात दुखणे, उलट्या होणे, अतिसार असे देखील त्रास होऊ शकतात. पावसाळ्यात होणाऱ्या इतर अनेक आजारांची देखील हिच लक्षणे असतात. त्यामुळे काहीवेळा रुग्णाकडून वैद्यकीय मदत घेण्यात देखील उशीर केला जाऊ शकतो. बऱ्याचदा संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात सौम्य लक्षणे दिसून येतात. त्यानंतर त्या व्यक्तीची सर्व लक्षणे निघून जातात आणि दुसऱ्या टप्प्यात किडनी व यकृत यांच्यावर परिणाम करणारी अतिशय गंभीर लक्षणे दिसून येऊ लागतात.

Comments
Add Comment