टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल
इच्छा असेल तिथे मार्ग आहे असे म्हणतात. मनोरंजनाच्या क्षेत्रात अभिनय करण्याची एका अभिनेत्याची इच्छा होती व ती त्याने मोठ्या जिद्दीने पूर्ण केली. तो अभिनेता म्हणजे प्रणव रावराणे. त्याचा ‘गूगल आई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
तो मूळचा मुंबईकर. त्याचं गाव कणकवलीत. मुंबईतील राजा शिवाजी विद्यालयात त्याचं शालेय शिक्षण झालं. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा त्याने पूर्ण केला. त्या दरम्यान दरवर्षी सोसायटीमध्ये एक व्यावसायिक नाटक पाहून त्याप्रमाणे तो इतर मंडळींसोबत नाटक करीत असे.त्यानंतर त्याने निर्माते, दिग्दर्शक रमेश मोरे यांच्या ‘चिंतन’ या अभिनय शिबिरामध्ये प्रवेश घेतला. पंधरा दिवसांचं शिबीर केले. शिबीर संपल्यावर जे नाटक झालं त्यामध्ये त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले.त्यानंतर त्याच्या जीवनातला टर्निंग पॉइंट म्हणजे निर्माते व दिग्दर्शक रमेश मोरे यांनी त्याला ‘आपण यांना पाहिलत का?’ या व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी दिली. त्यातील भूमिकेसाठी त्याला अल्फा गौरवच नॉमिनेशन होत. त्या व्यावसायिक नाटकानंतर त्याने एकांकिका केल्या,नंतर प्रायोगिक नाटक केलं व नंतर परत व्यावसायिक नाटक असा त्याचा या क्षेत्रातील प्रवास झाला.
त्यानंतर त्याने ‘सोहळा गोष्ट प्रेमाची’ हे व्यावसायिक नाटक केले, त्या नाटकाच्या लिखाणात, दिग्दर्शनात व सेट डिझाईनमध्ये त्याचा सहभाग होता. त्या नाटकासाठी झी गौरवच विशेष लक्षवेधी नाट्यनिर्मितीच पारितोषिक मिळाले. त्याला त्या नाटकासाठी सेट डिझाईनसाठी म. टा. सन्मान अॅवॉर्ड देखील मिळाले. नंतर लेखक, निर्माता, दिग्दर्शक संतोष पवार यांच्या नाटकात कामे केली. नंतर रिलायन्समध्ये नोकरी केली. रिलायन्सच्या नेटवर्क टॉवर डिपार्टमेंटमध्ये तो होता. रिलायन्सचे वाइस प्रेसिडेंट रवींद्र आवटी सरांच्या सहकार्याने त्याचे परत अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण झाले. त्याच्या आयुष्यातील पुढचा टर्निंग पॉइंट म्हणजे त्याला ‘हास्यसम्राट ‘ हा स्टँडअप शो मिळाला. शेवटी तो हास्यसम्राट झाला. त्यानंतर तो या मनोरंजनाच्या क्षेत्राकडे फुलटाइमसाठी वळला.
हास्य सम्राटमुळे लोक त्याला ओळखू लागले. त्यानंतर त्याला वस्त्रहरण, वाऱ्यावरची वरात ही नाटके मिळाली. त्या नाटकात दिग्दर्शक संजय जाधव व अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी त्याला पाहिले व दुनियादारी चित्रपटासाठी बोलावले. हा चित्रपट त्याच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला. त्या चित्रपटातील त्याची सॉरी ही व्यक्तिरेखा खूप गाजली. या चित्रपटानंतर त्यातील सगळेच कलाकार रातोरात स्टार झाले.
त्यानंतर त्याने किचन कलाकार मालिका केली. आटपाडी नाईटस, प्रीतम हे चित्रपट केले. वासूची सासू हे नाटक त्याने केले, त्यामध्ये सासूची भूमिका त्याने केली. ते नाटक पाहून झाल्यानंतर त्याला आटपाडी नाईटस चित्रपट मिळाला. नंतर प्रीतम हा चित्रपट मिळाला. हेमाडपंथी ही सीरिज मिळाली. मस्का हा चित्रपट त्याने केला.
‘गुगल आई’ हा त्याचा नवीन सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. हा फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. यामध्ये तो, त्याची पत्नी व त्याची मुलगी असे कुटुंब दाखविले आहे. एका कलाकाराला काम मिळालं नाही तर त्याची होणारी घुसमट या चित्रपटामध्ये पहायला मिळणार आहे. या चित्रपटातील नायकाला लेखक व दिग्दर्शक व्हायचे असते. परंतु त्याला संधी मिळत नाही. तो त्यासाठी प्रयत्न करीत असतो. उदरनिर्वाहासाठी तो ओला – उबेर गाडी चालवत असतो. सिनेमा मिळविण्यासाठी त्याची धडपड सुरू असते. एका दिग्दर्शकाला तो भेटतो व एका वेगळ्याच प्रसंगात तो अडकतो. त्याची मुलगी मोबाईल हाताळण्यात खूपच हुशार असते. तंत्रज्ञानाच्या चांगल्या व वाईट बाजू असतात. त्या वाईट बाजूमध्ये त्याची मुलगी आई-वडिलांना अडकवते. नंतर ते कुटुंब कसे बाहेर पडते, या साऱ्यांची गोष्ट म्हणजे ‘गुगल आई’ हा चित्रपट होय. या चित्रपटाचे शूटिंग हैदराबाद व पुण्यात झाले. यामध्ये पाच गाणी आहेत. गाण्याचे शूटिंग केरळ येथील निसर्गरम्य अशा बीचवर झालेले आहे. हा फॅमिली ड्रामा, संस्पेंस, ॲक्शन, थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक दक्षिणेकडचे आहेत, त्यांना चित्रपटाची भाषा चांगलीच कळते. हा चित्रपट खूपच छान झालेला आहे. प्रेक्षकांनी तो थिएटरमध्ये जाऊन पहावा अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.
प्रणव रावराणेला ‘गूगल आई‘ या त्याच्या चित्रपटासाठी व भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!