
राजरंग - राज चिंचणकर
एखाद्या शब्दाचा अर्थ त्यातल्या वैशिष्ट्यांसह आपसूकच ध्वनित होत असतो. ‘प्रयोगघर’ या शब्दातूनही बरेच काही सूचित होते; परंतु या शीर्षकातला ‘अंबुद’ हा शब्द मात्र व्यवहारात फारसा येत नाही. तर, ‘अंबुद’ म्हणजे पाण्याने भरलेला ढग! या ‘अंबुद’चा आणि ‘प्रयोगघरा’चा संबंध आता वेगळ्या पद्धतीने जुळून आला आहे. साधारण अडीच वर्षांपूर्वी कुर्ला येथे प्रायोगिक नाटकांसाठी ‘प्रबोधन प्रयोगघर’ या वास्तूची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यामुळे नाट्य चळवळीसाठी लागणाऱ्या जागेच्या शोधात सतत भटकणाऱ्या रंगकर्मींसाठी एक हक्काची वास्तू उपलब्ध झाली. मात्र हे ‘प्रयोगघर’ बंद होत असल्याच्या चर्चांना अलीकडे उधाण आले आणि त्यायोगे रंगकर्मींच्या उत्साहावरही मळभ दाटून आले; परंतु आता या प्रयोगघराला नवी पालवी फुटल्याचे चित्र असून, हे ‘प्रयोगघर’ आता या ‘अंबुद’मध्ये चिंब भिजू लागले आहे. ‘पल्लवी फाऊंडेशन’ आणि ‘स्वामीराज प्रकाशन’ यांनी या प्रयोगघरात आगळावेगळा असा ‘अंबुद महोत्सव’ घडवून आणला आणि या प्रयोगघराची दारे नव्या उमेदीने किलकिली झाली.
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे यांची या महोत्सवातली उपस्थिती विशेष ठरली. त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण वगैरे यथासांग झाले आणि त्यावेळी त्यांनी साधलेल्या संवादाला ‘अंबुद’ या शब्दाचीच नांदी होती. ते म्हणतात, “या शब्दाचा नक्की अर्थ काय, हे मी काही दिवस शोधण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यातून समजले की, ‘अंबुद’ म्हणजे पाणीदार ढग! तो पाऊस देणारा ढग आहे आणि आशा निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यात आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने त्याचे महत्त्व मला जास्त आहे. कारण मृगाचा पाऊस आला नाही, रोहिणीचा पाऊस आला नाही; तर शेतकऱ्याच्या मनाची काय कालवाकालव होते, ते मी लहानपणापासून पाहिलेले आहे”.
त्याचवेळी नाविन्याचा ध्यास आणि मराठी समाज याविषयी विवेचन करताना ते म्हणतात, “नावीन्याची ओढ जगातल्या कुठल्याही समाजाला पुढे नेणारी बाब ठरत असते. अशी ओढ असणे, त्याविषयीची संवेदना असणे आणि त्यासाठी वेळ काढता येणे, हे खऱ्या अर्थाने धडपडणाऱ्या माणसाचे पहिले लक्षण असते. अंकुर फुटणारा जो कुठला समाज असेल, तर तो मराठी समाज आहे आणि असा बिजांकुर निर्माण करणारा व त्यासाठी लागणारा ‘अंबुद’ निर्माण करणारा हा मराठी समाज आहे. जर कुणाकडून काही प्रेरणा मिळत असेल, तर ती अधिकाधिक विस्तारित करण्याचे, लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम जो समाज किंवा जी व्यक्ती करते; ती खऱ्या अर्थाने समाजपयोगी शक्ती निर्माण करत असते. त्यासाठी अशा प्रकारचे ‘अंबुद’ निर्माण व्हायला हवेत, आकाशात त्यांनी घिरट्या घालायला हव्यात, त्यातून वृष्टी व्हायला हवी आणि त्या वृष्टीतून नवे अंकुर निर्माण व्हायला हवेत. या ‘अंबुद’ महोत्सवातून त्याची नक्की सुरुवात होईल”.