मुंबई : जगातील मोठी संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टबाबत (Microsoft) मोठी माहिती समोर येत आहे. गेल्या काही तासांपासून सर्व्हरमध्ये (Server) बिघाड झाला असून याचा फटका जगाला बसला आहे. बँकांपासून (Bank) एअरलाइनपर्यंतच्या (Airline) सर्व सेवा विस्कळीत झाल्यामुळे सगळीकडे गोंधळ निर्माण झाला आहे. तसेच मायक्रोसॉफ्टचा वापर करणाऱ्या अनेक युजर्संच्या लॅपटॉप आणि कंप्यूटर्सच्या स्क्रिनवर एरर (Error) येऊ लागल्यामुळे युजर्समध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच करण्यात आलेल्या क्राउड स्क्रीम अपडेटनंतर ही समस्या सुरु झाली आहे. आज सकाळपासून क्लाउड सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेक भागात समस्या निर्माण झाली आहे. मायक्रोसॉफ्टसोबत काम करणाऱ्या CrowdStrike ने ही समस्या मान्य केली आहे. तसेच मायक्रोसॉफ्टच्या अभियंत्यांनी ही समस्या निर्माण करणारी सामग्री शोधून काढली असून लवकरच ती दुरुस्त करून त्यांना पूर्ववत केले जाणार आहे.
एअरलाइन्सला मोठा फटका
मायक्रोसॉफ्टमध्ये अडथळा सुरू झाल्याने देशातील अनेक विमानतळांवर सर्व्हर डाऊनचा फटाका बसला आहे. दिल्ली आणि मुंबई विमानतळावर ही परिणाम झाला आहे. अनेक विमानांची उड्डाण रखडली आहेत. तिकीट बुकिंगपासून चेक इन पर्यंत वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान आलेल्या अडचणीमुळे सर्व विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये ‘आमच्या सिस्टमवर सध्या मायक्रोसॉफ्ट आउटेजचा परिणाम झाला आहे. त्यामुळे बुकिंगसह चेकइनवर याचा अडथळा येत आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत’, असे म्हटले आहे.