
मुंबई: टी-२० आशिया कप २०२४मध्ये(asia cup 2024) १९ जुलैला क्रिकेट जगतातील दोन सर्वात मोठे संघ एकमेकांविरोधात भिडणार आहेत. भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा हा सामना श्रीलंकेच्या दांबुलामध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल.
दोन्ही संघाचा मागील रेकॉर्ड पाहिल्यास टीम इंडियाने १७ टी-२० सामने खेळले आहेत. यात विजय-परायजाचा रेकॉर्ड १०-५ असा आहे. त्यांनी फायनलमध्ये श्रीलंकेला १९ धावांनी हरवत हांगझोऊमध्ये आशियाई खेळात सुवर्ण पदक जिंकले होते.
यानंतर भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मैदानावर सलग दोन मालिका गमावल्या. सिलहटमध्ये बांगलादेशला ५-० असे हरवलेत. नुकतेच चेन्नईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत संपवली.
भारताच्या तुलनेत पाकिस्तानचा संघ या दरम्यान अधिक टी-२० सामने खेळला आहे. पाकिस्तानने या दरम्यान १९ सामन्यांपैकी ७ सामन्यात विजय मिळवला. तर १२ सामन्यांत त्यांना पराभव सहन करावा लागला. त्यांनी घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला ३-० असे हरवले.
आशियाई खेळामध्ये पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. तेथे त्यांना श्रीलंकेविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागले. त्यानंतर कांस्य पदकाच्या प्लेऑफमध्ये बांगलादेशकडून पराभव सहन करावा लागला. यानंतर त्यांनी बांगलादेशात आणि वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिका गमावली. नुक्त्याच इंग्लंडमध्ये झालेल्या मालिकेत त्यांना ३-० असा पराभव सहन करावा लागला.
भारत-पाकिस्तान हेड टू हेड
गेल्या काही वर्षात दोन्ही संघादरम्यान १४ सामने झाले. यात भारताने ११ सामन्यात विजय मिळवला आहे. आशिया कपमध्ये भारताचे पारडे जड आहे. भारतान पाकिस्तानविरुद्धच्या सहा सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने एक सामना जिंकला होता तो २०२२मध्ये सिलहटमध्ये गेल्या आशिया चषकात खेळवण्यात आला होता.
आशिया कपसाठी भारतीय महिला संघ - हरमनप्रीत कौर(कर्णधार),ऋचा घोष(विकेटकीपर), उमा छेत्री(विकेटकीपर), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरूंधती रेड्डी, जेमिमा रोड्रिग्स, रेणुका ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन. आशिया कपसाठी पाकिस्तानचा महिला संघ - निदा डार(कर्णधार), इरम जावेद, सादिया इकबाल, आलिया रियाज, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोजा, मुनीबा अली, सिदरा अमीन, नजिहा अल्वी, सैयदा अरूब शाह, नशरा सुंधू, तस्मिया रुबाब, ओमैमा सोहेल, तुबा हसन.