Tuesday, September 3, 2024
Homeताज्या घडामोडीPen News : पेणच्या गणेश मूर्तीकारांना भौगोलिक मानांकन प्रमाणपत्राचे वितरण!

Pen News : पेणच्या गणेश मूर्तीकारांना भौगोलिक मानांकन प्रमाणपत्राचे वितरण!

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते समारंभ पार

पेण : संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि गणपती मूर्तीचे (Ganesh Murti) माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पेणमधून (Pen News) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पेणचे गणपती हे प्रसिद्ध असल्याने काहीजण पेणच्या नावाने गणेश मूर्ती विक्री व्यवसाय करून ग्राहकांची फसवणूक करीत असतात. त्यामुळे पेणच्या गणराय व्यवसायिक यांना फटका बसत होता. यासाठी गणपती व्यवसायिकांनी दीड वर्षापूर्वी पेणच्या गणपतींना भौगोलिक मानांकन (जीआय) मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे (Central Govt.) पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून केंद्र सरकारने पेणच्या गणपतीला भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेण येथील गणेशमूर्ती सुबक असतातच तसेच मूर्तीचे रंगकाम देखील चांगले असते. या मूर्ती आकर्षक असतात. त्यामुळे येथील गणेशमूर्तींना संपूर्ण भारतात तसेच परदेशातील कानाकोपऱ्यात देखील प्रचंड मागणी आहे. पेणमधून दरवर्षी लाखो गणेश मूर्ती परदेशात पाठविल्या जातात. यात दरवर्षी शंभर करोड रूपयांहून अधिक उलाढाल होत असते. अनेकजण गैरफायदा घेत इतर ठिकाणी बनविलेल्या मूर्ती देखील पेण येथील गणेशमूर्ती असे सांगून विक्री करून गणेशभक्तांची फसवणूक केली जाते. त्यामुळे ही फसवणूक टाळण्यासाठी मूर्तीकारांना आणि व्यवसायिकांना मिळालेल्या भौगोलिक मानांकनाचा चांगलाच उपयोग होणार आहे. त्यासोबत पेणच्या गणेशमूर्तींचे ब्रँण्डींग आणखी मोठे होण्यास या मानांकनाची मदत होईल, असे रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी म्हटले.

दरम्यान, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीच्या मदतीने पेण येथील गणेश मूर्तीकार व व्यावसायिकांनी पाठवलेला जीआर मान्य करुन त्याबाबतचे प्रमाणपत्र पाठवण्यात आले होते. आज रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते त्याचे भौगोलिक मानांकन प्रमाणपत्राचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. यावेळी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग विभागाचे सह संचालक विजू शिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळ्या आदी मान्यवर उपस्थित होते. तर भौगोलिक मानांकन स्वीकारताना गणेश मूर्तिकार व व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष व प्रसिद्ध मूर्तिकार श्रीकांत देवधर, दीपक समेळ, उपाध्यक्ष किरण पाटील, सागर पवार, सचिन समेळ व पेण शहरातील असंख्य गणेश मूर्तिकार उपस्थित होते.

सध्या रायगड जिल्ह्यात उद्योग स्नेही वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गणेशमूर्तीकारांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन देखील जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी यावेळी केले.

१०० कोटी रुपयांची उलाढाल

पेण तालुक्यातील ६०० हून अधिक गणेश मूर्ती कारखान्यांमधून सुबक गणेश मूर्ती बनवण्याचे काम वर्षभर सुरू असते. प्लास्टर ऑफ पॅरीस आणि शाडूची माती या पासून गणेशमूर्तींची निर्मिती केली जाते. दरवर्षी सुमारे ४२ लाख गणेश मूर्ती पेणमधून देश-विदेशात पाठवल्या जातात. यातून सुमारे १०० कोटींहून अधिकची उलाढाल दरवर्षी होत असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -