वाडा : वाडा तालुक्यातील कोंढले-म्हसवल-खैरे रस्ता हा अनेक गावांना मुख्य बाजारपेठेस जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यावर मीठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावर वाहन चालवणे जिकिरीचे व कठीण होऊन बसल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. वाडा तालुक्यातील सर्वात खराब मार्ग म्हणून या रस्त्याची ओळख निर्माण झाली आहे. या खराब रस्त्यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील सबंधित अधिकारी या रस्त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचा आरोप भाजपा महीला आघाडीच्या तालुका अध्यक्षा अंकिता दुबेले यांनी केला आहे. या रस्त्यावरील सापरोंडे ते दिनकरपाडा दरम्यान काँक्रीट मार्ग करण्यात आला आहे.
मात्र निकृष्ट दर्जामुळे तोही दुभंगला गेला आहे. दिनकरपाडा रस्त्यावर खड्डे पडले असून वाहनचालक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. चंद्रपाडा व पुढे खैरे गावाकडे जाणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बनविण्यात आला होता. मात्र बनविल्यापासूनच या मार्गाची अवस्था गंभीर असल्याने लोकांच्या नशिबात सहा महिनेही चांगला प्रवास आला नाही.