Saturday, August 31, 2024

कथा ससा आणि कासवाची

ऋतुराज – ऋतुजा केळकर

“द्वारी आज तुझ्या उभी…
हाकारते मी आज…
श्वासाची तुळशीमाळ तुटू पाहे…”

आषाढीच्या तोंडावर हा अभंग माझ्या लेखणीतून उतरला आणि जाणवलं खरचं साऱ्या सुखाच्या राशी ओसंडून वाहत असतानाही, माणूस स्वतःशीच जेव्हा हितगुज करतो, तेव्हा तो खूप एकटा असतो. आजूबाजूच्या भौतिक जगातून जर आपल्या अंतरात्म्यात डोकावून पाहिलं, तर जाणवतं की, आपल्या आत्म्याचा औदुंबर अजूनही रज आणि तम या गुणांच्या किडेने पोखरलेला आहे. आपली मुळे अजूनही कर्म, ज्ञान आणि भक्ती या तीनही योगांपर्यंत हव्या तितक्या प्रमाणात पोहोचली नाहीत म्हणूनच असेल कदाचित या आत्मारूपी औदुंबराला निर्विकार बुद्धीच्या सूर्याची किरणे वेढू शकत नाहीत.

कसं आहे ना, त्या करिता गरज आहे ती, प्रगल्भ चिंतनाची. आपल्याला वास्तवाची जाणीव असणे गरजेचे आहे. लहानपणापासून आपण ससा आणि कासवाची गोष्ट ऐकत आलो आहोत. त्यात ससा दुडुदुडु धावत पुढे जातो. रस्त्यात तो हिरवगार लुसलुशीत गवत पोटभर खाऊन, खळाळत्या निर्झराचं पाणी पिऊन, निवांतपणे विश्राम करतो. अंती शेवटच्या पडावावर पोहोचतो, तिथं तो हरलेला असतो; कारण कासव तिथं आधीच पोहोचलेलं असतं. कासव ती शर्यत जिंकतो; कारण त्याच्या रस्त्यातील छोट्या छोट्या आनंदांकडे तो दुर्लक्ष करतो आणि ससा त्याचवेळी ते सारे आनंद उपभोगतो. तो ससा ते सारे त्याचवेळी भरभरून जगतो. ‘खरोखरच कोण बरोबर कोण चुकीचं?’ हा वादाचा मुद्दा आहे.

स्वतःच्या इच्छा-आकांक्षा मारून, यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा ध्यास घेतलेलं, ते कासव योग्य की, जीवनाचा सर्वार्थाने आनंद घेत घेत, भरभरून जीवन जगत, चांदण्यांच्या ओंजळीनं पाणी पित जगणारं; पण भौतिक दृष्टीने हरलेला तो ससा? माझ्या मते, म्हणाल तर दोघेही त्यांच्या त्यांच्या जागेवर योग्यच आहेत. सुख-दुःखाच्या देदीप्यमान आरशात देवचाफ्यासारख्या आपल्या सुखस्वप्नांचे साऊल प्रतिबिंब आणि वास्तवाचे दर्शन हे नेहमीच अगदी भिन्न असते, यात संशयच नाही. त्यातला फरक हा अनुभवांच्या अत्तर थेंबांनी वास्तवाच्या अनवट नक्षीदार पक्षीरवासारखी मनात जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला तर आणि तरच कालच्या मागधी ऋतूच्या काच तुकड्यातून अभेद्य अस्तित्व बांधणीच्या अगाध मायेची तुळशीमाळ आपण जीवाच्या कराराने जपू शकू.

आता असं पाहा, रोज रोज आपण आपल्या मोबाइलवर सारख्या तुकड्या तुकड्याने वेगवेगळ्या रिल्स पाहत असतो. कित्येकांचे वेगवेगळे विचार ऐकत असतो. बहुसंख्य लोक छातीठोकपणे अशा परिस्थितीत असं वागू नका… असं वागा… असे अनाहूत सल्ले देत असतात; पण कसं आहे ना की, त्यात एक गोष्ट आपण अजिबात विसरतोय आणि ती म्हणजे “घटा घटाचे रूप आगळे…” वेगवेगळ्या व्यक्ती एकाच परिस्थितीत वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देत असतो. कसं आहे ना की, पक्षी किंवा प्राणी हे भूक नसली ना, तर अजिबात खात नाहीत; पण माणूस मात्र त्यांच्या अगदी विपरीत आणि विसंगत वागतो. “वासनांची तृप्ती करण्याकरिताच आपला जन्म आहे” हा आणि असा विचार करून, तो प्रत्येक श्वास घेत असतो आणि अखेरीस शेवटच्या घटकेस मुक्तीच्या किनाऱ्याची स्तब्धता त्याला पार आतून ढवळून काढते म्हणूनच दुसऱ्याच्या अनुभवांच्या शिदोरीवर आपल्या आयुष्याचा ढाचा बांधू नका.

उपभोगाच्या शतकमलांची माळ ही जरी कितीही सुंदर असली, तरीही त्याला लागलेली चिंता, भीती तसेच बदनामीची कीड ही नेहमीच वाईट असते म्हणूनच दुबळे, निरस, अर्थहीन आयुष्य जगून दुष्परिणामांच्या गर्तेत ओढले जायचे नसेल, तर जीवन संगीताच्या सुरात साधक-बाधक सुरांची स्वानुभावाची मुरली आपणच वाजवायला हवी. जेणेकरून नैतिकतेच्या पायाभरणीने फुलून आलेली जीवनपुष्पे मेहेफिल संपता संपता केशरी रंगविभोर संध्याकाळी मुक्तीच्या मार्गावर ऋतू परिवर्तनाच्या अलवार अद्वैत झुकळेबरोबर काळाच्या पल्याड अलवारपणे
निघून जातील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -