Friday, October 31, 2025
Happy Diwali

Brahminy Kite : गरुडासारख्या दिसणाऱ्या ब्राह्मणी घारीचे ठाणे खाडीत दर्शन

Brahminy Kite : गरुडासारख्या दिसणाऱ्या ब्राह्मणी घारीचे ठाणे खाडीत दर्शन

दक्षिण भारतातून शेकडो मैलाचा प्रवास करत भक्ष्य शोधण्यासाठी घिरट्या

प्रशांत सिनकर

ठाणे : ठाणे खाडीत फ्लेमिंगो पक्ष्यांना बघण्याची नजाकत काही वेगळी असताना, गरुडासारखा चालाख आणि घारीसारखा दिसणारी ब्राह्मणी घार पक्षीप्रमींचे लक्ष वेधत आहे. समुद्र-खाडीतील माशांबरोबर नदी तलावातील माशांचा फडशा पाडण्यासाठी ब्राह्मणी घार दक्षिण भारतातून येत असून सावजाला (माशाला) पकडण्यासाठी पाण्यावर झेपावताना बघण्याची वेगळी संधी ठाणेकराना मिळत आहे.

हिवाळ्यात ठाणे खाडीच्या दिशेने अनेक स्थलांतरीत पक्षी झेपावत असले तरी पावसाळ्यात ब्राह्मणी घार खाडीवर घिरट्या घालताना दिसून येतात. सर्वसाधारण घारीसारखी ही घार दिसत असली तरी ब्राह्मणी घार आकाराने लहान आहे. पावसाळा सुरू झाला की ही ब्राह्मणी घार केरळ-गोवा राज्यातून कोकणाच्या दिशेने येते. शरीराचा रंग तांबूस तर डोक्याचा आणि मानेचा रंग पांढऱ्या रंगाचा आहे. आपल्या काळ्या घारींची शेपटी दुभंगलेली असून ब्राह्मणी घारीची शेपटी ही गोलाकार आहे. यावेळी ही ब्राह्मणी घार खारफुटीच्या जंगलात झाडाच्या शेंड्यावर बसलेली दिसून येत असल्याची माहिती पक्षी अभ्यासक हिमांशू टेंभेकर यांनी दिली.

खाडीवर भक्ष्याच्या शोधात स्थानिक घारी घिरट्या मारताना आढळतात, त्यामुळे ही ब्राह्मणीघार खाडीवर विहार करताना पटकन समजून येत नाही. खाडीमधील माशाला पकडण्यासाठी त्या पाण्यावर झेपावतात, त्याचवेळी त्यांना बघण्याची संधी पक्षीप्रेमींना मिळते. गरुडासारखीच तीक्ष्ण नजर असणारी ही घार सावजाला पापणी लवते ना लवतेच तोच शिकार करते. मासे हे त्यांचे सर्वात आवडते खाद्य असून समुद्र अथवा नदीकाठी देखील या घारींचा वावर असतो. डिसेंबर ते जानेवारी हा या घारींचा विणीचा हंगाम असून पावसाळ्यात दिसणाऱ्या या घारी सप्टेंबरनंतर दक्षिण भारतात माघारी जात असल्याचे पक्षी अभ्यासक मंदार बापट म्हणाले.

ठाणे खाडीमध्ये कारखान्यातून सोडले जाणारे रासायनिक द्रव्य, शहरातील सांडपाणी आदी घटकांमुळे खाडीतील पाणी प्रदूषित झाले आहे. खाडीत ऑक्सिजनची मात्राच नसल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे खाडीत मासे, खेकडे, कोळंबीसारखे जलचर नोमशेष होण्याच्या मार्गावर आहेत; परंतु महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून खाडीत सोडलेल्या पाणठळ जागेत जलचरांची साखळी वाढली आहे. याच ठिकाणी या ब्राह्मणीघारी माशांचा फडशा मारण्यासाठी घिरट्या मारत आहेत, असे ठाणे पक्षी अभ्यासक, मंदार बापट यांनी म्हटले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >