Saturday, August 31, 2024

प्रकाशयात्रा!

आपल्या सग्यासोयऱ्यांवर ‘कसा वार करू’ म्हणून शस्त्रं टाकलेला अर्जुनाला खऱ्या ‘स्व’रूपाची जाणीव करून देणारे, त्यासाठी त्यांनी केलेला उपदेश म्हणजे ‘भगवद्गीता’ होय. अर्जुनाच्या मिषाने साऱ्या जगाचे संसाराचे ओझे हलके करणारे श्रीकृष्ण! त्यासाठी त्यांनी सगळ्यांना दिला ‘गीते’चा प्रकाश! या गीतेच्या प्रकाशात असंख्य भक्त उजळून निघाले, उजळून निघत आहेत आणि पुढेही उजळून निघतील, कारण गीता आणि ज्ञानेश्वरी आहे ‘प्रकाशयात्रा!’

ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

रणांगणात आपल्या आप्तांना पाहून, भांबावून गेलेला अर्जुन! आपल्या सग्यासोयऱ्यांवर ‘कसा वार करू’ म्हणून शस्त्रं टाकलेला अर्जुन! या अर्जुनाला भानावर आणणारे भगवान श्रीकृष्ण! त्याला खऱ्या ‘स्व’रूपाची जाणीव करून देणारे. त्यासाठी त्यांनी केलेला उपदेश म्हणजे ‘भगवद्गीता’ होय. मुळात अर्जुनासाठी सांगितली गेलेली गीता ही खरं तर साऱ्या मानवजातीला उपयोगी आहे. संसारात गोंधळून गेलेल्या सामान्यजनांना ती योग्य मार्ग दाखवते, जगण्याला दिशा देते. या गोष्टीचं वर्णन ज्ञानदेव कसं करतात, ते ऐकण्यासारखं आहे. त्यासाठी पाहूया अठराव्या अध्यायातील अद्भुत ओव्या!
‘म्हणून वेदाचेही सुसेवन करण्यास योग्य अशी ही मूर्तिमंत गीता स्वतः श्रीकृष्णांनी पंडुसुत अर्जुन याला सांगितली.’ ओवी क्र. १४६६

‘परंतु वासराचे प्रीतीकरिता सर्व घरादाराला गाईच्या दुधाचे सुख मिळते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने सर्व जगाचा उद्धार झाला.’ ओवी क्र. १४६७

‘चातकाची कळकळ मनात बाळगून मेघ पाण्याची वृष्टी करितो, त्या वृष्टीने सहज सर्व जगाचे जसे सांत्वन होते.’ ओवी क्र. १४६८‘अथवा एकनिष्ठ जे कमल, त्याला प्रफुल्लित करण्याकरिता वारंवार सूर्य उदयास येतो, परंतु तेवढ्याने त्रिभुवनातील सर्व प्राण्यांच्या डोळ्यांना प्रकाश मिळाल्यामुळे सुख होते.’ ओवी क्र. १४६९
‘या न्यायाने श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मिषाने गीता प्रकाशून,ै जगाचे संसाराएवढे मोठे ओझे हलके केले.’ ओवी क्र. १४७०
ही ओवी अशी –

तैसें अर्जुनाचेनि व्याजें। गीता प्रकाशूनि श्रीराजें।
संसारायेवढें थोर ओझें । फेडिलें जगाचें॥ ओवी क्र. १४७०
किती अचूकपणे, यथार्थपणे ज्ञानदेवांनी हा विचार मांडला आहे! त्यासाठी अप्रतिम दृष्टांत दिले आहेत. यातील पहिला दाखला गाय आणि वासरू यांचा आहे. श्रीकृष्ण हे वत्सल गाईप्रमाणे, तर अर्जुन हे त्याचं वासरू आहे. गीता ही दुधाप्रमाणे आहे. वासरासाठी असलेल्या दुधाचा लाभ सगळ्या घराला मिळतो, त्याप्रमाणे गीतेने साऱ्या मानवजातीचं पोषण होतं. हे पोषण चांगल्या विचारांचं, वागणुकीचं होतं. यानंतरचा दृष्टांत चातक पक्ष्याचा आहे. चातकाची तहान भागवणारा मेघ आहे. त्याप्रमाणे ज्ञानासाठी, भगवंताच्या भक्तीसाठी तृषाकूळ अर्जुन आहे. मेघामुळे संपूर्ण चराचर निवतं. त्याप्रमाणे गीतारूप वृष्टीने सगळ्या मानवप्राण्यांना लागलेली आत्मज्ञानाची तहान भागते, ते तृप्त होतात. पुढील दाखला कमल व सूर्याचा आहे. कमलाला उमलवण्यासाठी सूर्य रोज उदयाला येतो. त्यामुळे साऱ्या त्रिभुवनाला प्रकाशाचे सुख मिळते.

सूर्याप्रमाणे तेजस्वी, जीवनदाता श्रीकृष्ण आहेत, तर अर्जुन हा कमलाप्रमाणे आहे. श्रीकृष्णांचा प्रकाश म्हणजे ‘गीता’ होय. यातील तत्त्वविचाराने अर्जुनाच्या जोडीने सर्व त्रिभुवनातील लोकांचे अंतःकरण उजळून निघते. गाय-वासरू-घरदार, मेघ-चातक-जग, सूर्य-कमल-त्रिभुवन असे हे एकाहून एक सुंदर, अर्थपूर्ण दाखले ज्ञानदेव देतात. त्यातून त्यांना जो सांगायचा विचार आहे, तो सुस्पष्ट होतो. तो विचार आपण ऐकला. अर्जुनाच्या मिषाने साऱ्या जगाचे संसाराचे ओझे हलके करणारे श्रीकृष्ण! त्यासाठी त्यांनी सगळ्यांना दिला ‘गीते’चा प्रकाश! या गीतेच्या प्रकाशात असंख्य भक्त उजळून निघाले, उजळून निघत आहेत आणि पुढेही उजळून निघतील, कारण गीता आणि ज्ञानेश्वरी आहे ‘प्रकाशयात्रा!’

manisharaorane196@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -