Saturday, August 31, 2024
Homeमहाराष्ट्रकिनेश्वरवाडी रस्त्यावर कोसळले दरडींसोबत महाकाय दगड

किनेश्वरवाडी रस्त्यावर कोसळले दरडींसोबत महाकाय दगड

’गुगल मॅप’वर दरडग्रस्त भागाचा ‘इन्व्हेस्टर पॉइंट’ उल्लेख

पोलादपूर : तालुक्यातील किनेश्वरवाडी येथे नियोजित धरणासाठी ठेकेदाराकडून सेवानिवृत्त महसुली अधिकारी व खासगी व्यक्तींमार्फत जमिनीची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्यानंतर ‘गुगल मॅप’वर (Google Map) ज्या भागाचा ‘इन्व्हेस्टर पॉइंट’ (Investor Point) असा उल्लेख येऊ लागला आहे; त्या किनेश्वरवाडीच्या रस्त्यावर मातीच्या ढिगाऱ्यासोबत महाकाय दगड कोसळल्याची घटना झाल्याने, परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. तहसीलदार कपिल घोरपडे आणि पोलीस ठाण्यातील हवालदार स्वप्नील कदम यांनी घटनास्थळी जाऊन, ग्रामस्थांना दरडीच्या धोक्याची कल्पना देऊन, सुरक्षितस्थळी मुक्कामी राहण्यास आवाहन केले.

पोलादपूर तालुक्यातील किनेश्वरवाडी येथील नियोजित धरणासाठी २००९ मध्ये लघुपाटबंधारे विभागामार्फत कार्यक्रम तयार करण्यात येऊन, अनुकूलता दर्शक अहवाल तयार करण्यात आल्यानंतर या भागातील धरणासाठी संपादित करण्यात येणाऱ्या संभाव्य जमिनींचे मोठ्या प्रमाणात खरेदी व्यवहार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत तसेच खासगी व्यक्तींमार्फत करण्यात आल्याने, या क्षेत्रासाठी ‘गुगल मॅप’ या ॲपवर ‘इन्व्हेस्टर पॉइंट’ असा उल्लेख येऊ लागला आहे.

या ठिकाणी किनेश्वर ते किनेश्वरवाडी हा रस्तादेखील भूसंपादनाचा मोबदला अदा केल्याविना करण्याचे काम सुरू झाले होते. आड चांभारगणी येथून साधारणपणे १५० मीटर अंतरावरील रस्त्यावर लगतच्या डोंगरातून लाल मातीचे ढिगारे आणि तीन महाकाय दगड कोसळून दरडप्रवण क्षेत्र निर्माण झाले. यामुळे गावाला धोका निर्माण होऊन तहसीलदार कपिल घोरपडे यांनी १७ कुटुंबांपैकी ७ कुटुंबातील २४ सदस्यांना किनेश्वरवाडी अंगणवाडी येथे सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले.

यावेळी अंगणवाडीचा खंडित करण्यात आलेला विद्युतपुरवठा सुरळीत करून, या ग्रामस्थांना रात्री दिवाबत्तीच्या उजेडामध्ये राहण्याची सुविधा केली. तहसीलदार घोरपडे यांच्यासोबत महसुली कर्मचारी देखील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यासाठी सहभागी झाले होते. हा किनेश्वर ते किनेश्वरवाडी रस्ता बॅरिकेट्स टाकून वाहतुकीस बंद करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांना आड ते किनेश्वर मार्गाचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करावा लागणार आहे. पोलादपूर पोलीस ठाण्याचे हवालदार स्वप्नील कदम यांनी घटनास्थळी जाऊन, ग्रामस्थांना दरडीच्या धोक्यापासून सावध राहण्यासह किनेश्वर ते किनेश्वरवाडी रस्त्याचा वापर करण्याचे बंद करण्याचे आवाहन केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -