
जीवन संगीत - सद्गुरू वामनराव पै
सूर्य उगवतो, मावळतो असे आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात तो उगवतही नाही आणि मावळतही नाही. तो आहे तसाच, आहे तिथेच आहे. तसेच जीवाच्या ठिकाणी आहे. जीव शरीर धारण करतो व शरीर सोडतो. फक्त शरीर बदलते. जसा माणूस कपडे बदलतो त्याचप्रमाणे जीव शरीर बदलतो. जीवाला मरणही नाही आणि जन्मही नाही. जीवाच्या अपेक्षेत जन्म व मरण हे शब्द चुकीचे आहेत, त्यामुळे जन्म मरणातून सुटका म्हणणे देखील चुकीचे ठरेल. ते तत्त्व स्फुरद्रूप आहे म्हणून ते सतत स्फुरत असते. त्याला दाबणे शक्य नाही. तुम्ही म्हणाल सागराच्या लाटा दाबेन तर ते तसे शक्य होणार नाही. तसेच आपल्या ठिकाणी ती लाट उसळतच असते व ती उसळतच राहणार. आपण जे काही करतो ते सर्व आनंदासाठी करत असतो, आनंदातूनच निर्माण होत असते व आनंदासाठीच चाललेले असते. फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते.
आपण लग्न करतो, कुटुंब वाढते. कशासाठी? आनंदासाठी. शाळा-कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचे ते कशासाठी? ज्ञानासाठी, कारण आनंद हा ज्ञानातूनच येतो. म्हणून शाळा-कॉलेजात जाऊन ज्ञानाभिमुख अभ्यास केला पाहिजे, केवळ मार्क्स मिळविण्यासाठी नाही तर आनंदासाठी, ज्ञानासाठी केला पाहिजे. हे आम्ही नेहमी सांगत असतो. याचप्रमाणे गाणे शिकणे, सद्गुरूंकडून आध्यात्म शिकणे, वाद्य वाजवायला शिकणे, या सर्व गोष्टी माणूस कशासाठी करत असतो. आनंदासाठी करतो की दुःखासाठी करतो? या सर्व गोष्टी आपण जीवनात आनंदासाठी करत असतो. खरं म्हणजे आपले स्वरूप हे आनंद असल्यामुळे तो आनंद आपल्याला बाहेरून आणावा लागत नाही. तो आतूनच स्फुरत असतो. स्वानंद बाहेर येतो तेव्हा तो आनंद होतो. हा आनंद दुसऱ्याला देतो तेव्हा ते सुख होते. हे सुख आपल्याकडे परत येते, तेव्हा ते समाधान होते. हे समाधान जेव्हा मुरते तेव्हा होते ती शांती. म्हणूनच “शांती परते नाही सुख येर अवघेचि दुःख” असे म्हटलेले आहे.
हे सर्व मी सांगतो आहे कारण मोक्ष या संकल्पनेबद्दल समाजात अनेक अंधश्रद्धा, चुकीच्या कल्पना व गैरसमज रूढ आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे जन्म मरणांतून सुटका म्हणजे मोक्ष किंवा मोक्ष हे एक ठिकाण असून पुण्यवान माणसे मेल्यानंतर तिथे जातात, अशा विपरीत कल्पना जनमानसात मोक्षाबद्दल आहेत. प्रत्यक्षात मोक्षाचा अर्थ साधा व सरळ आहे. मोकळा होणे किंवा स्वतंत्र होणे म्हणजेच मोक्ष. मग प्रश्न निर्माण होतात की माणूस कोणत्या बंधनातून मोकळा होतो? आणि पारतंत्र्यात असणे म्हणजे नेमके काय? याचे उत्तर अगदी सोपे आहे. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला कसलीच बंधने नसतात. मात्र जसजसा तो वाढू लागतो तसतशी त्याला अनेक बंधने येऊन चिकटतात. मिळालेल्या नावापासून या बंधनांची सुरुवात होते. त्यानंतर गोत्र, कुल, जात, वर्ण, धर्म, पंथ, संप्रदाय ही सर्व बंधने त्याच्यावर लादली जातात. त्याच जोडीला मुलगा, भाऊ, काका, मामा, बाप अशा बंधनांनी तो जखडला जातो. या सर्व प्रकारातून आणि मिळालेल्या संस्कारांतून एक प्रकारचा मानसिक पिंजरा तयार होतो व तो माणूस त्यात अडकतो. हा मानसिक पिंजरा म्हणजेच माणसाला जडलेले बंधन किंवा पारतंत्र्य होय आणि जीवनविद्येच्या सिद्धांतानुसार या पिंजऱ्यातून माणसाची सुटका होणे म्हणजेच मोक्ष होय.