Friday, August 29, 2025

Kalyan News : कल्याण रिंग रोड प्रकल्पातील चार टप्प्यांचे काम पूर्ण

Kalyan News : कल्याण रिंग रोड प्रकल्पातील चार टप्प्यांचे काम पूर्ण

दुर्गाडी ब्रिज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला

कल्याण : डोंबिवली आणि टिटवाळा या दोन्ही शहरांतील अंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत गाठता यावे, यासाठी उभारण्यात येत असलेल्या कल्याण रिंग रोडच्या आठ टप्प्यांपैकी टप्पा चार ते सात (दुर्गाडी ब्रिज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) अशा चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून, रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तर उर्वरित टप्प्यांचे काम देखील जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकत्याच पार पडलेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत दिल्या.प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन देखील जलदगतीने करण्यात यावे, अशा सूचनाही खासदार डॉ. शिंदे यांनी दिल्या.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागाच्या वाहतुकीला अधिक गती प्राप्त करून देणारा कल्याण रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या मार्गाच्या उभारणीनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतुकीला एक नवा आयाम प्राप्त होणार आहे.

या प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी, नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, कल्याण-डोंबिवली महानरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना खासदार डॉ. शिंदे यांनी दिल्या.

कल्याण रिंग रोड या प्रकल्पाची आठ टप्प्यांमध्ये उभारणी करण्यात येत आहे. यातील टप्पा - ४ (दुर्गाडी ब्रिज ते गांधारे ब्रिज), टप्पा - ५ (गांधारी ब्रिज ते मांडा जंक्शन), टप्पा - ६ (मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन), टप्पा - ७ (टिटवाळा जंक्शन ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) या टप्प्यांचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतिपथावर आहे, तर रस्ता नागरिकांच्या सेवेत आला आहे.

टप्पा - ३ (मोठा गाव ब्रिज ते गोविंदवाडी रोड) या रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून २०२६ पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे. टप्पा - १ (हेदुटणे ते शिळ रोड) आणि टप्पा - २ (शीळ रोड ते मोठागाव ब्रीज) या मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करून हे देखील काम २०२६ पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. या प्रकल्पामुळे काटई - टिटवाळा हे एक तासाचे अंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांवर येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >