मुरूड : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मुरूड ते तक्का आदिवासीवाडी रस्ता वाहून गेल्याने, साधी टू-व्हीलर देखील जाणे अवघड झाले असून, ऐन पावसाळ्यात शेतीच्या कामात शेतकरी व आदिवासी बांधवांना आपल्या दैनंदिन जीवनात त्रास व हाल सोसावे लागत आहेत.
मुरूडच्या अलकापूरी पाण्याच्या टाकीपासून दीड कि. मी. अंतरावर असलेला तक्का आदिवासीवाडी रस्ता आजपावेतो दुर्लक्षित राहिला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात येथील आदिवासी बांधवांना बाजारहाट करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आपली अवजारे साहित्य शेतात घेऊन जाणे अवघड झाले आहे. अतिवृष्टीमुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणावर पावसाचे ओहोळ जाऊन अक्षरशः वाहून गेल्याने, रस्त्यावरुन पायी चालणे अवघड झाले आहे.शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाने व ग्रामपंचायतीने यात लक्ष पुरवून तक्का आदिवासीवाडी रस्ता दुरुस्त करून चांगल्या रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.