
बारस्करांना दोन दिवसांपासून येत आहेत धमक्या; नेमकी गाडी जळाली की जाळली?
पंढरपूर : अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Baraskar) यांच्यासंबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे. आषाढी एकादशीच्या (Aashadhi Ekadashi) पहाटे पंढरपुरात (Pandharpur) अजय बारस्करांच्या गाडीने पेट घेतला. याविषयी बारस्करांनी ताबडतोब पोलिसांत तक्रार केली. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना धमक्या येत आहेत. त्यामुळे त्यांची गाडी नेमकी जळली का जाळली असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे. पोलिसांनी याचा कसून शोध सुरु केला आहे.
आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला आलेल्या अजय महाराज याना सातत्याने धमक्या मिळत असल्याचा व्हिडीओ महाराज यांनी फेसबुक वर करून व्हायरल केला होता. यानंतर बारस्कर यांनी पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर आपली MH 12 BP / 2001 ही टोयाटो कंपनीची कार भाविकांच्या निवासा साठी उभारलेल्या ६५ एकर येथील भक्तिसागर येथे पार्क केली होती. अजय महाराज बारस्कर स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते. यानंतर एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली.
यानंतर तातडीने अजय महाराज बारस्कर यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली असून यात कार कशाने तरी जळाली असल्याची तक्रार दिली आहे. यामुळे १ लाखाचे नुकसान झाल्याचेही बारस्कर यांनी तक्रारीत सांगितले आहे. पोलीस आता कार जळालेल्या परिसरात असणाऱ्या सीसी टीव्ही व इतर माहितीच्या आधारे चौकशी करीत आहेत.
कार जळण्यामागे जरांगे समर्थकांचा हात?
मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांना विरोध करणारे अजय बारस्कर त्यांचे पूर्वीचे सहकारी होते. बारस्कर यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपुरात येण्याआधी आपल्याला धमकी येत असल्याचा आरोप करत व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला होता. पंढरपूरमध्ये ये तुला मारतो जाळतो अशा धमक्या येत असल्याचा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी बारस्कर यांनी सोशल मिडीयावर शेअर केला होता. यातच त्यांना जरांगे समर्थकांनी केलेला धमकीचा एक फोन देखील व्हायरल झाला आहे. यात हा समर्थक बारस्कर यांना शिवीगाळ आणि धमकी देत असल्याचे दिसत आहे.