शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर; शिक्षकांवर कारवाईचा बडगा
पुणे : राज्य सरकारकडून (State Government) इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा (Scholarship Exam) घेण्यात येते. नुकत्याच पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत २००हून अधिक शाळांना भोपळा मिळाला आहे. यामुळे संतापलेला शिक्षण विभाग (Education Department) अॅक्शन मोडवर (Action Mode) आला असून शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता पाचवीच्या वर्गातील मुला मुलींसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आलेल्या परीक्षेत पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad School) तब्बल २१४ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. या निकालाबाबत शिक्षण विभागात तीव्र संताप पसरला असून संबंधित शिक्षकांविरोधात गंभीर दखल घेतल्याचे समोर आले आहे.
राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी तयार करणे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची असते. मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याबाबत शिकवलेच नाही. त्यामुळे याप्रकरणी शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच समाधानकारक खुलासा न मिळाल्यास संबंधितांची एक वेतनवाढ रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिक्षकांवर कारवाईचा बडगा
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६२१ इतक्या शाळा आहेत. त्यापैकी पाचवी इयत्तेच्या ९३२ शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होणे गरजेचे होते. परंतु जिल्ह्यातील १०९ शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरले नसल्याचे समोर आले. त्यामुळे पुणे विभागात मोठ्या प्रमाणात शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शून्य टक्के लागला आहे. या कारणामुळे शिक्षण विभागाने संबंधित शाळेच्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.