‘असा’ असेल प्रवास; भाजपा नेते विनोद तावडे यांची माहिती
मुंबई : मुंबईकरांचे आकर्षण आणि उत्सुकतेचा विषय असणारी मुंबईतील पहिली भुयारी मेट्रोबाबत (Mumbai Underground Metro) एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भाजपा (BJP) नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो आता लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सोपा व जलद गतीने होणार आहे. त्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे.
येत्या २४ जुलैपासून मुंबईत पहिली भूमिगत मेट्रो धावणार आहे. ही मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशी धावणार असून यादरम्यान एकूण २७ स्थानके असणार आहेत. पूर्वी प्रवाशांना आरे ते कफ परेड दरम्यान दोन तासाहून अधिक वेळ लागत होता. मात्र आता हा वेळ निम्म्याने कमी होणार आहे. या मार्गासाठी जास्तीत जास्त १ तास लागणार आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.
मेट्रोचे वैशिष्टये
ही मेट्रो सेवा सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार असून, रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या मेट्रोचा वेग जवळपास ताशी ९० किमी इतका असेल. एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार ही भूमिगत मेट्रो ३५ किमीचे अंतर अवघ्या ५० मिनिटांमध्ये पार करु शकणार आहे.
ही असतील स्थानके
कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल मेट्रो, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शितलादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रुझ, सहारा देशांतर्गत विमानतळ, सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ आणि आरे डेपो अशी भुयारी मेट्रोची २७ स्थानके आहेत.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुंबईकरांचे जीवन अधिक सुखदायक बनवण्याची हमी दिली होती. पंतप्रधानांची ती हमी आता पूर्ण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे २४ जुलैपासून सुरु होणाऱ्या या भूमिगत मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे.