Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Pandharpur : अवघे गर्जे पंढरपुर!

Pandharpur : अवघे गर्जे पंढरपुर!

आषाढीनिमित्त पंढरीत आज वैष्णवांचा महासोहळा

विठ्ठल नामाचा जयघोष, हरिनामाच्या गजरात दिंड्या व पालख्या दाखल

सूर्यकांत आसबे

सोलापूर : आषाढी एकादशीचा महासोहळा बुधवारी तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये (Pandharpur) मोठ्या भक्तीभावाने साजरा होत असून यासाठी किमान १२ लाखाहूनअधिक भाविक पंढरीत दाखल झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सपत्नीक श्री. विठ्ठल व रुखुमाईची शासकीय महापूजा करणार आहेत.

गेली अनेक दिवस पायी येणारे पालखी सोहळे लाखो भाविकांसह मंगळवारी दशमी दिवशी सायंकाळी विठुरायाच्या नगरीत दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीसाठी यंदा प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.भाविकांची संख्या लक्षणीय दिसत असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दशमी दिवशी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालख्या सायंकाळी पंढरपूरमध्ये दाखल झाल्या. वाखरी येथील मुक्काम आटोपून व सकाळी संत भेटीचा कार्यक्रम झाल्यानंतर पंढरीतून या संतांच्या भेटीसाठी गेलेल्या पालख्यांसह हे सोहळे पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले. पंढरपूर शहराच्या हद्दीवर इसबावी येथे पालख्या व दिंड्यांचे अत्यंत उत्साहात शहरवासीयांनी स्वागत केले.

दरम्यान आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब मंगळवारी सायंकाळी पंढरपुरात दाखल झाले. त्यांच्या समवेत अनेक मंत्री सुद्धा महापूजेसाठी मंदिरात उपस्थित राहणार आहेत.

मंगळवारी दशमी दिवशी सायंकाळी पंढरपूर शहर भाविकांनी फुलून गेले होते. हरिनामाच्या गजरात दिंड्या व पालख्या पंढरीत दाखल होत होत्या. श्री विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्श दर्शन रांगेत जागा मिळवण्यासाठी भाविकांची धावपळ सुरू असल्याचे दिसून आले.

पत्राशेड भरून दर्शन रांग पुढे गोपाळपूरच्या दिशेने गेली आहे. यंदा यात्रेचे नियोजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि त्यांच्या टीमने नेटके केले आहे. बंदोबस्तासाठी सुद्धा हजारो पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी जास्त प्रमाणात बंदोबस्त असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवले जात आहे.

चंद्रभागेच्या परिसरात वारकऱ्यांची सोय

दरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीत भाविकांना आणण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने हजारो फेऱ्या करण्यात येत आहेत. रेल्वेनेसुद्धा जास्त गाड्या सोडून भाविकांची सोय केली आहे. भाविकांना राहण्यासाठी चंद्रभागेच्या परिसरात असलेल्या ६५ एकर जागेमध्येसुद्धा वारकऱ्यांसाठी मोठी सोय करण्यात आली आहे. वाळवंटात दशमी दिवशी हजारो विठ्ठल भक्तांनी चंद्रभागेत स्नानासाठी गर्दी केली होती.

भाविकांना सेवा-सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा बुधवारी साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. पंढरपूर शहरातील सर्व मठ, लॉज, भक्त निवास भाविकांनी फुल्ल झाले आहेत. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची गर्दी दिसून येत आहे. चंद्रभागा नदीपात्रात पवित्र स्नान करण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली असून चंद्रभागा तीरावर भाविकांची सर्वात जास्त गर्दी दिसून येत आहे. त्याचबरोबर विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची लागलेली रांग १० पत्राशेड पूर्ण करून गोपाळपूरपर्यंत पोहोचली आहे. विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करीत आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून अतिरिक्तपणे नियोजन करण्यास मोठी गती देण्यात आली आहे. पाणी, स्वच्छता, निवारा आणि आवश्यक त्या सेवासुविधा भाविकांना पोहोचविण्यात जिल्हा व पोलिस प्रशासनाला यश येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा